नात्यांचं कॉलम बिम..

इमारतीचे बांधकाम चालू असताना त्याचा कणा असलेले कॉलम, बिम आपण उभारत असतो. यासाठी  लोखंडी फ्रेम किंवा लाकडी फळ्यांच्या सांगाड्यात पाणी, खडी, वाळू, सिमेंटचे मिश्रण(काँक्रिट) ओतले जाते. नंतर त्याला रोज पाणी देत काही दिवसांनी हे कॉलम पक्के मजबूत होत सेट होऊन जातात.


त्यावरील लोखंडी फ्रेम काढल्या जातात. नंतर आपण या कॉलम बिम मधे काहीही बदल करु शकत नाही.  त्यावर साधा खिळा ही ठोकता येतं  नाही आपल्याला. आपलं आयुष्यही असच असतं. लहानपणी, महाविद्यालयीन जीवनात ज्यांच्याशी आपली मैत्री असते. एकमेकांच्या जुळलेल्या स्वभावाने, सहवासाने हे मैत्रीचं नातं हळूहळू सेट होऊन जातं असतं.

ज्या शहरात, गावात हे नात दृढ होत असतं त्याचे कॉलम बिम असेच तिथल्या माती विषयीच्या प्रेमानं, संस्काराने सेट होत रुजुन गेलेले असतात. म्हणूनच विसाव्या वर्षी ओल्या वयात आपणं नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात गेलो तर हळूहळू आपणं त्या शहरात सेट होत स्थायिक होताना फार त्रास होत नाही.

पण अगदी वयाच्या पन्नाशीला तुम्हीं आपलं शहर सोडून इतर ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार देखील सहजपणे करु शकणार नाही. कारण या शहरात तुमची जडण घडण झालेली असते. तुमची पाळेमुळे इथे स्थिरावलेली असतात. आपली जीवाची, प्रेमाची माणसे दिसण्याची, त्यांना भेटण्याची तुम्हाला रोजची सवय झालेली असते.

एखादया हॉटेल मधे जेवायला, निवांत बसून गप्पा मारायला, लांब कुठे ट्रीपला जाताना तुम्हाला तुमची हीच जिवाभावाची माणसे, मित्र हवीहवीशी वाटत असतात. कारण त्यांची तुमची नाळ केंव्हाच जोडलेली असते. नात्याच काँक्रिट सेट झालेलं असतं. 

अन् जेव्हा या पलीकडची माणसे नोकरी, व्यवहाराच्या निमित्ताने भेटतात. तेव्हा हा गोडवा तुम्हाला यात कधीही दिसतं नसतो.. मग कितीही खिळे ठोका, नात्याच नवीन काँक्रिट ओता. ते कधीही एकरूप होणार नाही अन् खिळाही ठोकता येणार नाही. आपलं जीवन असच कुठेतरी सेट झालेलं असतं. ते फक्त जाणून घेता यायला हवं. आपल्याला हवं तिथं रमण्याचा आनंद काय असतो. हे कळू लागतं मग आपोआप...

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !