पुणे - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदती ३१ मार्च २०२२ पर्यंत 'ई-केवायसी' पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात यावे. अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.
पुणे येथील उपआयुक्त (कृषिगणना) तथा पथक प्रमुख पी. एम. किसान योजना विनयकुमार आवटे यांनी या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे या सूचना दिलेल्या आहेत. ई केवायसी करणे बंधनकारक असल्याचे त्यात म्हटलेले आहे.
विशेष जनजागृती मोहिम राबवून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅबमध्ये जावे.
किंवा पी. एम. किसान अॅपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल.
त्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर फक्त १५ रुपये प्रति लाभार्थी, असा निश्चित करण्यात आलेला आहे, अशा सूचना देखील आयुक्तालयातून विनयकुमार आवटे यांनी परिपत्रकात दिलेल्या आहेत.