पिंपळगाव माळवी तलाव परिसरात 'अशी' सृष्टी साकारावी ही नगरकरांची इच्छा..

मुंबईतील संजय गांधी पार्क येथील हा सुंदर नजारा... खरेतर आपल्या अहमदनगरमधे भविष्यात असं दृश्य आपण साकार करु शकतो. तुम्ही म्हणाल, की ती मुंबई आहे. म्हणून तिथे सारं काही शक्य आहे. आपल्या अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून देखील हे सहज शक्य आहे.

निसर्गाने भरभरुन हिरवेगार सौंदर्य दिलेल्या डोंगरगण रस्त्यावरील म्हणजे त्याचं परिसरातील पिंपळगाव माळवी येथे महापालिकेची ७०० एकर पेक्षा जास्त जागा आहे. इतक्या सुंदर ठिकाणी आपली जागा असणं, म्हणजे आपलं महाभाग्यच आहे.

जर पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी यांनी पर्यटनाच्या दृष्टीने आपली ओळख व्हावी, या हेतूने आत्मियतेने विचार केला, नगरकरांना आपल्या कुटुंबीयांसह  पर्यटनाचा आनंद घेता यावा. बाहेरचे पाहुणे आपल्या येथे सहलीसाठी यावेत, ही प्रामाणिक इच्छा मनी बाळगली, तर हे सहज शक्य आहे.

सोन्यासारख्या जागेचा उपयोग शहराच्या हितासाठी झाल्यास पर्यटनासाठी खास बाब म्हणून सरकारकडून या प्रकल्पासाठी मोठा निधीही उपलब्ध होईल. अनेक शहरात असे लोकोपयोगी उपक्रम यशस्वी झाले आहेत. अशा प्रकारचा बोटिंग, गार्डन पार्क आपल्याकडे साकार व्हावा. कारण याठिकाणी यासाठीची निसर्ग संपदा आपल्याला भरभरून मिळाली आहे.

अन्यथा काही वर्षात येथील जागा हळुहळू अतिक्रमणाच्या विळख्यात सापडेल याची भीती वाटते. आपले नागरिक सार्वजनिक  दुर्व्यवस्था निमूटपणे सहन करीत जगत असतात. आपल्या सार्वजनिक हक्काची देखील फारशी माहिती त्यांना नसते. नेत्यांनी आपल्या भाषणात केवळ मोठी स्वप्न जरी दाखवली तरी आनंदाने ती नाचायला लागतात.

निदान त्यांच्या नशिबी असं एखादं रम्य स्थळ पाहण्यात आलं, तर ती तुम्हाला खूप आशीर्वाद देतील...!! महापालिकेलाही अशी काही निर्मिती साकार केल्याचा मोठा आनंद होईल. रोजगार वाढेल. पालिकेला यातून आर्थिक उत्पन्नही मिळेल. आपल्याकडे असं काही व्हावं, ही अनेक नगरकरांची इच्छा आहे..

पुण्या, मुंबई, नगरमधील संबंधीत तज्ञ, प्रामाणिक, अभ्यासू लोकांच याकरिता मार्गदर्शन घ्यावं... आपल्या मातीला बरकत आहे. प्रामाणिक प्रयत्न केल्यास इथे सहज शक्य आहे. फक्त, कर्तव्यांची जाणीव हवी.. दृष्टी हवी..  अन् शहराविषयी प्रेम हवं.

- जयंत येलुलकर (माजी नगरसेवक, रसिक ग्रुप, अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !