महानगर...
तो शोधत असतो तिथे त्याची स्वप्नांची दुनिया..
आयुष्य रंगवताना संघर्षासोबत मैत्रीही होते त्याची...
पहाटे मुलं झोपेत असताना,
बाप संसाराच्या सुखासाठी बाहेर पडतो..
दिवसभर कष्ट करताना गर्दीत कधी हरवल्यासारख वाटतं नसतं त्याला...
पत्नीने दिलेला जेवणाचा डबाआपुलकीने कोपऱ्यात बसून खाताना,तृप्त होत असतो तो...या दाटीवाटीच्या दुनियेत..!
काम संपवून रात्री घरी येताना,
लोकलच्या गर्दीतून वाट काढीत,
कधी जागा मिळूनही जाते..
तर कधी उभा असतो हातापायांत गुंतलेल्या गर्दीत..
तेव्हा दिसत असते त्याला खिडकी बाहेर,स्वतःसोबत धावणारी रेल्वेची पटरी...अन् डोळ्यासमोर असतातघरी वाट पाहणारी गोजिरी मुले..
तो थकलेला असतो खूप..
लोकलच्या हॉर्नचा आवाज देत असते,
त्याच्या स्वप्नांना उर्जा...
तासाभराच्या प्रवासात त्याचंही स्टेशन येणार असतं..
रुळावर हळूहळू थांबलेला डबा..अन् बाहेर पडणारी बिन चेहऱ्यांची गर्दीत्यालाही घेऊन पडते बाहेर आपल्या सोबत...प्लॅटफॉर्मवरून झरझर चालताना निघतो तो घराकडे...
जसजसं घर जवळ येतं...
तेव्हा घामानं डबडबलेल्या चेहऱ्यावर
रुमाल फिरवत तो दार वाजवतो...
आपल्या बाबांची वाट पहात मुलं झोपी गेलेली असतात...
माऊली वाट पहात असते ...
बाळाच्या केसांवरून हात फिरवताना,थकवा केंव्हाच पळून गेलेला असतो त्याचा...घरट्यात आल्यावर,तो जिंकलेला असतो...रोजच्या सारखा..
- जयंत येलूलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)