ज्ञानेश दुधाडे यांना 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार

अहमदनगर - ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने देण्यात येणारा 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' २०२० 'दैनिक सार्वमत'चे चिफ रिपोर्टर ज्ञानेश दुधाडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.


जिल्हा परिषदेचे मुख्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी हा पुरस्कार दुधाडे यांना प्रदान केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सोमनाथ जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

महिला बचत गटाचे मेळावे, त्यांची यशोगाथा, याबाबत वेळोवेळी केलेल्या लिखाणाबाबत दुधाडे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.

श्री. ज्ञानेश दुधाडे हे गेली १७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत करत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेसह, राजकारण, समाजकारण, आराेग्य, प्रशासन, क्रीडा, शिक्षण आदी विषयांवर त्यांनी नेहमी विधायक व सकारात्मक बातमीदारी केली आहे.

श्री. ज्ञानेश दुधाडे यांना यापूर्वीही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय पुरस्कार, अहमदनगर प्रेस क्लबचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, मराठवाडा मित्र मंडळ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पत्रकारितेत येणाऱ्या नव्या पिढीसाठी ज्ञानेश दुधाडे हे प्रेरणास्थान आहेत, अशा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांचा गौरव केला. या पुरस्काराबद्दल श्री. ज्ञानेश दुधाडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !