नवी दिल्ली - 'ओमायक्रॉन' या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या प्रकाराने भारतात प्रवेश केला आहे. मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या ९ परदेशी नागरिकांसह एकूण १० जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. ते १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबई विमानतळावर आले होते.
तर ७ दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानात परतलेल्या एका कुटुंबातील चौघे जण कोरोना बाधित आढळले आहेत. यात पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. या सर्वांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. त्यांनाही क्वारंटाइन केलेले आहे.
दि. २५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या कुटुंबाने इतर बारा नातेवाइकांच्या भेटी घेतल्या. होत्या. त्यातील ५ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यात एका सोळा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
या सर्वांना 'ओमायक्रॉन संशयित' समजून क्वारंटाइन केले आहे, अशी माहिती राजस्थानच्या यूनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे अधीक्षक अजित शेखावत यांनी दिली आहे. या सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
'सोशल डिस्टन्स' पाळा, 'मास्क' वापरा
'ओमायक्रॉन संशयित' म्हणून आढळलेल्या व्यक्तींवर उपचार सुरु असून कोणीही घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असली तरी घराबाहेर पडताना 'सामाजिक अंतर' पाळावे, तसेच सक्तीने 'मास्क' वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.