अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून नेवासा, राहुरी व पाथर्डी तालुक्यात घरफोड्या करून चोरट्यांनी धुुमाकूळ घातला आहे. हे गुन्हे करणाऱ्या टोळीतील तिघे जण जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचचे पीआय अनिल कटके यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडयाच्या घटना वारंवार घडत असल्याने त्यांनी स्वतंत्र तपास पथक नेमले होते. क्राईम ब्रँचचे पीआय अनिल कटके यांनी या स्वतंत्र पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पथकानेच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी रविंद्र मुबारक भोसले (रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला ताब्यात घेतले. त्याने लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केल्याची गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी नंबर ऊर्फ लखन प्रल्हाद चव्हाण (रा. अंतापुर, ता. गंगापुर), कुलथ्या बंडु भोसले (रा. बाबरगाव, ता. गंगापुर), यांना पकडले.
कसून चौकशी केल्यावर त्यांनी १५ दिवसांचे कालावधीत त्यांनी राहुरी, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील शेतातील वस्त्यावर जावुन मारहाण करुन लुटल्याचे सांगितले. त्यांना शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनला हजर केले आहे. पुढील कारवाई शनिशिंगणापुर पोलिस करीत आहेत.
सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, फौजदार सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमुल व बबन बेरड यांनी आरोपींना पकडले.
या टोळीने आतापर्यंत ५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्यावर राहुरी पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरी, आर्म ऍक्टचे दाेन गुन्हे, नेवासा पोलिस स्टेशनला घरफोडी व दरोडा, पाथर्डी पोलिस स्टेशनला धाडसी दरोडा, व शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी कुलथ्या बंडु भोसले (रा. बाबरगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) याच्याविरुध्द यापुर्वी गंभीर स्वरूपाचे सहा दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, तर वाळुंज (जि. औरंगाबाद) पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाच दरोड्याचे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.