अहमदनगर - महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने बेमुदत संप सुरू केला होता. हा संप बाराव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा बेेमुदत संप स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीचे प्रतिनिधी संतोष कानडे यांनी दिली आरह.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार १८ डिसेंबरपासून महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींनी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची शासनदरबारी दखल घेतली.
तातडीने प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासंदर्भात शासननिर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. तर राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले. यानंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्यांनी बेमुदत काम आंदोलन काही दिवसांकरता स्थगित केले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे व महाविद्यालयीन कामकाज सुरळीत होऊ शकेल.
या संपाचा परिणाम विद्यापीठाच्या व महाविद्यालयीन कामकाजावर झाला. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कृती समितीच्या पदाधिकार्यांची ऑनलाईन बैठक घेतली. सर्व मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तसे लेखी पत्रही उपसचिव यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी पत्राद्वारे मिळाले. त्यामुळे कृती समितीने मंगळवारी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीत संप स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली आहे, असे कानडे यांनी म्हटले आहे.