अहमदनगर - शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या बदलीनंतर यांची औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी नवे शहर पोलिस उपअधीक्षक आले आहेत.
काही दिवस या पदावर प्रभारी अधिकारी नियुक्त होते. पण आता पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले आहेत. अनिल अर्जुन कातकडे हे नगर शहराचे नवे पोलिस उपअधीक्षक असणार आहेत.
माजी पोलिस उपअधीक्षक ढुमे यांच्या बदलीनंतर काही आठवडे शहर उपविभागाचा पदभार नगर ग्रामीणचे पाेलिस अधीक्षक अजित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता. परंतु, मध्यंतरी थेट श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे नगर शहर उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षकपदी कमलाकर जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तर या शाखेचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांची नाशिक शहर सहाय्यक आयुक्तपदी बढतीवर बदली झाली आहे. हे दोन्ही पोलिस उपअधीक्षक नाशिक जिल्ह्यातून बदलून आले आहेत.
मिटके यांनी यापूर्वीही नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. श्रीरामपूर व नगर शहराचा अतिरिक्त कार्यभार पाहण्याची कसरत त्यांना करावी लागली. जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेचा तपासही मिटके करत होते. आता तो तपास नव्या पोलिस उपअधीक्षकांकडे जाण्याची शक्यता आहे.
नवे उपअधीक्षक हजर होताच संदीप मिटके यांच्याकडे पुन्हा श्रीरामपूर उपविभागाचा कार्यभार सोपवला जाईल. त्यामुळे नवेे पोलिस उपअधीक्षक कातकडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवला जाईल, अशी शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे होता. परंतु, या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तो शहर उपविभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवलेला होता.