अहमदनगर - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतर मान्यवरांच्या हस्ते बुधवारी सकाळी नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे थाटात लोकार्पण झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे शुभेच्छा संदेश दिला. हा सोहळा दिमाखदार झाला असला तरी दिवसभर चर्चा मात्र दुसऱ्याच एका गोष्टीची होती.
या सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बबन पाचपुते, आमदार लहू कानडे, पद्मश्री पोपटराव पवार, राहीबाई पोपरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
परंतु, आमदार बबन पाचपुते वगळता भाजपचे कोणीही पदाधिकारी या सोहळ्याकडे फिरकले नाही. तसेच पालकमंत्री मुश्रीफ हे देखील या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याला आले नाहीत. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
असाही योगायोग - मंत्री बाळासाहेब थोरात सन २०१४ मध्येही महसूलमंत्री होते. त्यांच्या हस्तेच या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आता पुन्हा महसूलमंत्री म्हणून त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत या प्रशस्त व सुसज्ज नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे उद्घाटन पार पडले.
वीजबचत - जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत औरंगाबाद रस्त्यावर शासकीय विश्रामगृहा पाठीमागे आहे. या इमारतीची भव्यता पाहता येथे मोठ्या प्रमाणात वीज लागेल, असे वाटत होते. पण नवीन वास्तूत सौर उर्जेचा वापर असणार आहेे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता संजय पवार आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याबद्दल या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.