अहमदनगर - जिल्ह्यात गेले दोन तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात बांधलेल्या शेळ्या मेंढ्या थंडीमुळे मृत पावल्या आहेत. या शेळ्या-मेंढ्यांच्या मालकांना नगर झेडपी मदत करेल, असे आश्वासन पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिले आहे.
नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे तब्बल सुमारे ८०० शेळ्या-मेंढ्या दगावल्याची माहिती झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदेचा सेस फंड सध्या उपलब्ध नाही, मग ही मदत कोठून करणार, असा प्रश्न उपस्थित झाला. परंतु, इतर फंडातून किंवा बचतीतून ही मदत केली जाईल, असे गडाख म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पारनेर, संगमेनर, नगर, श्रीगोंदा, अकोले आणि कर्जत तालुक्यात शेळ्या आणि मेंढ्यांचे दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. याचा माेठा फटका पशुपालकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या जनावरांच्या मालकांना झेडपीने मदत द्यावी, अशी मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली होती.
झेडपी सदस्य राजेश परजणे यांनी पदाधिकाऱ्यांनी आघाडी सरकारच्या माध्यमातून या पशूपालकांना मदत करण्यासाठी निधी आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर गडाख यांनी आपण यापूर्वीच यासाठी प्रयत्न केले होते, असे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ३० ते ४० लाख रुपयांची तरतूद करणार असल्याचे गडाख म्हणाले.