अहमदनगर - अनेकदा गुन्हेगारीचे सामाजिक पडसाद उमटू लागले की 'नगरचा बिहार झालाय', असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की नगरमध्ये बिहार राज्यासारखीच गुन्हेगारी फोफावली आहे. गुरुवारी मात्र, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याहून आणखी धक्कादायक माहिती दिली आहे.
अनेकदा गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ तक्रार अर्ज देण्यावरही भर असतो. पण अशा तक्रार अर्जांची छाननी करून अदखलपात्र किंवा दखलपात्र गुन्हे दाखल केले. त्यामुळे गेल्या वर्षभरात १५ हजार ३५५ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर १८१ प्रकरणात गुन्ह्याचे स्वरूप कमी करून अदखलपात्र नोंद झाली आहे.
सन २०२१ या वर्षामध्ये नगर जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांत मिळून एकूण तब्बल २१ हजार ४२५ गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांविरूद्ध अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या वर्षभरात विनयभंगांच्या गुन्ह्यात १२० ने, तर बलात्कारांच्या गुन्ह्यात २५ ने वाढ झाली आहे. खासगी सावकारीचे २१ गुन्हे दाखल केले आहेत.
प्रत्येक गुन्हा दाखल झाला की, त्यातील आरोपींची वर्गवारी केली जाते. त्यानुसार ५७० प्रोफेशनल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्यांची माहिती प्रोफेशनल क्रिमिनल वेबसाईटवर अपडेट केली आहे. जिल्ह्यात एकूण ४०१ टोळ्या असल्याचे आढळून आले आहे. या टोळ्यांवर कारवाई केली जात आहे.
संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरूद्ध मोक्का कायद्यानुसार प्रस्ताव तयार केले. आतापर्यंत १६ टोळ्यांच्या विरोधात प्रस्ताव पाठवले. तर १५ टोळ्यांना मोक्कानुसार कारवाई करण्यात नाशिकच्या विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांनी परवानगी दिली. अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.
काय आहे 'टू प्लस' योजना - गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी टू प्लस योजना राबवली. दोन किंवा त्याहून जास्त गुन्हे दाखल असलेल्या, सराईत आरोपींची माहिती संकलित केली. पोलिस ठाणे, गुन्हे शाखेतील एक अधिकारी व पोलिस पोलिसांचे पथक नेमून ही माहिती अपडेट केली.
सर्वाधिक गुन्हे दाखल होणे, ही भूषणावह बाब नाही. गुन्हेगारी वाढल्याचेच ते द्योतक आहे. परंतु, नगर पोलिसांनी गुन्हे दडपणे बंद केले आहे. याचे चांगले सामाजिक पडसाद भविष्यात दिसतील, असेही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले.