अहमदनगर - ज्या वयात त्याने चांगले शिक्षण घेऊन नवीन ज्ञान आत्मसात करायचे, उज्वल भविष्याचे स्वप्न पहायचे, त्याच वेगळी वाट निवडली. त्यामुळे वारंवार कारागृहात जावे लागले. तरीही तो सुधरायला तयार नाही. सोबतच्या साथीदारांनाही त्याने याच रस्त्याने नेले. म्हणून आता 'विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांनी त्याच्यावर 'मोक्का' अंतर्गत कारवाईला मंजुरी दिली आहे.
रस्त्यात अडवून लूटमार करण्यात कुख्यात असलेल्या सागर भांड आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी मिळाली आहे. मयूर दिलीप देवकर नावाच्या एका युवकाला भांड व त्याच्या साथीदारांनी लुटले होते. याप्रकरणी राहुरी पोलिस स्टेशन येथे यांनी दरोडा व भारतीय हत्यार कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा कुप्रसिद्ध भांड टोळीने केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सागर भांड व त्याच्या ५ साथीदारांना अटक करण्यात आली होती. ही टोळी कामधंदा न करता संघटीतपणे स्वतःच्या आर्थिक फायद्द्यासाठी शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करत होती.
त्यांच्याविरूद्ध राहुरी, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, शिरूर, संगमनेर तालुका, सुपा, शिर्डी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सागर भांड याच्या टोळीत गणेश रोहिदास माळी, नितीन मच्छिंद्र माळी, रवि पोपट लोंढे, निलेश संजय शिंदेे, रमेश संजय शिंदे या नेवासे, राहुरी व नगरच्या युवकांचा समावेश आहे. सागर भांड हा पोलिसाचा मुुलगा आहे.
विशेष म्हणजे या टोळीतील सर्व युवकही वीस ते पंचवीस या वयोगटातले आहेत. या सर्वांवर राहुरी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचे वाढीव कलम लागले आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे साेपवण्यात आला आहे.