अहमदनगर - नगर तालुक्यातील गोविंद आण्णा मोकाटे या माजी पंचायत समिती सदस्याविरूद्ध गेल्या आठवड्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यानंतर तालुक्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांना इशारा दिला. परंतु, सोशल मिडियावर तनपुरे यांनाच ट्रोल करण्यात आले आहे.
माजी पंचायत समिती सदस्य गोविंद माेकाटे हा राज्यमंत्री तनपुरे यांचा खास कार्यकर्ता आहे. त्यांच्या विजयात मोकाटे यांची महत्वपूर्ण भूमिका आहे, असे मोकाटे समर्थक सांगत असतात. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करण्यातही मोकाटे याने जीवाचे रान केले होते, असे कार्यकर्ते म्हणतात.
ही बातमीही वाचा - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
गेल्या आठवड्यात मोकाटे याच्याविरूद्ध बलात्काराचा व महिलेला चाकूचा धाक दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून गोविंद मोकाटे फरार आहे. यानंतर दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात मंत्री तनपुरे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना इशारा दिला होता.
'विरोधकांना पराभव पचवता आला नाही. ज्यांच्यामुळे पराभव वाट्याला आला, त्यांचाच आता विरोधक काटा काढायला निघाले आहेत. परंतु, याद राखा, विरोधकांचा हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो', असा इशारा मंत्री तनपुरे यांनी कोणाचेही नाव न घेता दिलेला होता.
यावरूनच मंत्री तनपुरे सोशल मिडियावर ट्रोल झाले आहेत. 'तुमच्या खास कार्यकर्त्याच्या त्या कारनाम्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून त्याचा खरा चेहरा समोर आला आहे. मंत्री तनपुरे यांनी आपण कोणाचे समर्थन करतो, हे पहावे', अशा प्रतिक्रिया त्यांना येत आहेत.
ही बातमीही वाचा - 'गोविंद मोकाटे' प्रकरणी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, याद राखा जर..