अहमदनगर - महाराष्ट्राचे उर्जा, राज्यमंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना काेरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वत:च सोशल मिडियावरून ही माहिती दिली आहे.
उर्जामंत्री तनपुरे हे बुधवारी सकाळी अहमदनगर दौऱ्यावर येणार होते. नगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशस्त इमारतीच्या उद्धाटन व लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहणार होते. परंतु, ते या कार्यक्रमाला आले नाहीत. या कार्यक्रमाला इतर राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारीही अनुपस्थित होते.
बुधवारी रात्री राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वत:च आपण कोराेना बाधित असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मिडियावरून त्यांनी ही माहिती दिली आहे. आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, काळजीचे काहीही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अलीकडच्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृष्य लक्षणे आढळली तर त्वरीत उपचार सुरू करावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दि. २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता ही माहिती दिली आहे.
मंत्री तनपुरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी आपण लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने काम कराल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.