पुन्हा पुन्हा आठवावं वाटतं..
ते बालपण, शाळा, कॉलेज,मित्र..
त्यांचा दंगा..
मैदानावरच क्रिकेट,
जिंकण अन् हरणं..
यावी पुन्हा,
मित्रांसोबतची संध्याकाळ..
रस्त्यावरची भटकंती..
कधी कॅन्टीन, तर कधी एखादा पिक्चर..
कोणाचा वाढदिवस.. तर कधी पार्टी...
यावं पुन्हा हे सारं..
रिटेक होत...
मोहरून जावं या क्षणांनी..
बहरून यावं..
दिसावं,जगावं जसच्या तसं..
सामना खेळल्यानंतर घरी येताना,,
मित्रांसोबतचा चहा,
नेहमीचं हॉटेल अन् प्रेमळ मालक..
स्वप्न पडायची.. गावसकर झाल्याची..
हुरळून जायचो..पुन्हा पडू दे ती स्वप्नं जशीच्या तशी..मागे मागे फिरु दे...पळू दे जोरात...मग येऊ दे पुन्हा हळूहळू पावले टाकीत इथवर...हेच लहानपण मिळू दे..
सायकलवर फिरवणारा माझा बाबा भेटू दे..
पहाटे उठून जेवणाचा डबा देणारी आई दिसू दे..
केसांवरून हात फिरवीत कौतुक करणारी ताई बोलू दे..
खूप भेटायचं त्यांना... कडकडुन..
गोकुळ तेच होत..
गाणंही तिथेच होतं..
मोरपिसातला कृष्ण तिथेच दिसायचा..
उजाडत चाललेली पहाट..
पक्षांची किलबिल,
खिडकीतून भेटणारी सूर्याची किरणे..
तशी आता भेटतं नाहीं...सूख दुःखात धावून येणारीनातीही हल्ली दिसतं नाही...तेव्हा तेच खरं होतं...
दिवाळीला बनवलेला आकाशकंदील,
उजळला की त्याचं सूख काही औरच असायचं...
शाळेच्या बाई जीव लावायच्या,
हेडमास्तरांची छडी संस्कार द्यायची..
शाळा सुटल्याचा आनंद वेगळा होता.
प्रगती पुस्तक सातबारा होता..
जशी जशी दप्तराची साथ सुटतं गेली
तशी जगण्याची मजा हरवत गेली...
कधी कधी आमच्या बाई दिसतात,
भेटल्यावर मुलांच्या आठवणीत रमतात...
मस्ती केल्यावर पाठीवर धपाटा घालून
कान धरणाऱ्या बाई,
आता खूप थकल्या आहेत...
जिव्हाळा मात्र त्यांचा तसाच आहे.
परीक्षा असल्यावर देवालापास करायची प्रार्थना करायचो..तो बाप्पा आजही आशीर्वाद देत उभा आहे...कटलेला पतंग पळत जाऊन धरताना..आकाशाला मिठीत घेतल्याचा आनंद व्हायचा...
आजीच्या पत्राची आई वाट पहायची,
पोस्टमन दारात आला की आनंदून जायची..
ते पोस्टमन काकाही हल्ली भेटतं नाहीत.
अन् मोबाईलच्या मॅसेजचा तसा ओलावा वाटतं नाही.
खरंच, ते सारं खूप छान होतं...आठवलं की मन प्रसन्न होत....म्हणूनच,वर्तमानात भूतकाळाच बोटं धरून चालावं लागतं..
- जयंत येलूलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)