अहमदनगर - शहरातील राजकीय नेत्यांना पत्राद्वारे धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी युनायटेड रिपब्लिकनचे अशोक गायकवाड यांना धमकीचे पत्र आले होते. आता शिवसेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांनाही धमकी देण्यात आली आहे. शहर शिवसेनेने याबाबत बुधवारी तोफखाना पोलिसांकडे तक्रार केली.
अशोक गायकवाड सिव्हिल हडकोनजिक बिशप लॉयड कॉलनीत राहतात. ते कामानिमित्त कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. घरी परतले असता त्यांना घरासमोर पत्र दिसले. त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. कॉलनी सोडून जाण्यासही सांगितले होते. त्यांनीही तोफखाना पोलिसांकडे तक्रार केली आहे.
शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम अनिल राठोड यांनाही धमकी आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले पत्र त्यांना मिळाले आहे. हे पत्र निनावी असल्यामुळे कोणी पाठवले ते समजू शकलेले नाही. पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलेली आहे.
शिवसेनेचे प्रमुख कार्यालय चितळे रोडवर आहे. तेथील कार्यालयात राठोड यांच्या नावाने हे पत्र प्राप्त झाले. त्यात राठोड यांना शिवीगाळ देखील केलेली आहे. पत्र मिळताच त्यांनी शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह तोफखाना पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक विश्वास भान्सी हे करीत आहेत. गेले काही दिवसांत तोफखाना पोलिसांच्या हद्दीत दोन राजकीय नेत्यांना धमक्यांचे पत्र आल्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. यामागे कोण आहे, याचा लवकरच शोध घेतला जाईल, असे तोफखाना पोलिसांनी सांगितले आहे.