लष्करी प्रशिक्षणात असे अनेकदा म्हणतात, की जे लष्करी अधिकारी आपल्या सैनिकांसोबत लढाईच्या आघाडीवर असतात, खंदक आणि रणांगणांच्या समोरून नेतृत्व करतात, तेच त्यांना विजय मिळवून देतात. जनरल बिपिन रावत हेही असेच एक सेनापती होते. ज्यांनी आपल्या युनिट, बटालियन आणि सैन्याचे नेतृत्व करत सर्वोच्च परंपरेत भारतीय सैन्याचे नेतृत्व केले.
दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता असतानाही लष्करप्रमुख बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपीन रावत यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जनरल रावत यांना युद्धाच्या आघाडीशिवाय बंडखोरी आणि नियंत्रण रेषेची आव्हाने हाताळण्याचा एक दशकाचा अनुभव होता. ईशान्य भारतातील बंडखोरी नियंत्रित करण्यात आणि म्यानमारमधील बंडखोरांच्या छावण्या नष्ट करण्यातही जनरल रावत यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते.
काउंटर इनसर्जेंसी आणि हाय अल्टिट्यूड वॉरफेअरमधील तज्ञ, जनरल रावत यांचा प्रतिकूल परिस्थितीत उत्कृष्ट परिणाम देण्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड होता. सन 1986 मध्ये, जेव्हा चीनसोबत तणाव वाढला, तेव्हा रावत हे कर्नल पदावर इंडो-चायना बॉर्डर बटालियनचे कमांडिंग अधिकारी होते. तर सन1987 मध्ये अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमेवर झालेल्या संघर्षाच्या वेळी ते आपल्या बटालियनच्या पाठीशी उभे राहिले आणि चीनला एक इंचही जमीन घेऊ दिली नाही.
जनरल रावत यांनी सन 2008 मध्ये काँगो प्रजासत्ताकमध्ये आक्रमक कारवाई करून संयुक्त राष्ट्र शांतता मोहिम यशस्वी केली. बिपीन रावत यांनी जेव्हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नॉर्थ किव्हू ब्रिगेडचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखणाऱ्या दलांसाठी परिस्थिती प्रतिकूल होती.
जनरल रावत म्हणायचे की, पहिली गोळी आमची नसेल. पण त्यानंतर आम्ही किती गोळ्या झाडल्या ते मोजणारही नाही. पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी आपल्या सैनिकांना दिल्या होत्या. रावत हे त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिलेले होते. भारतीय लष्कर दोन आघाड्यांवर नव्हे तर अडीच आघाड्यांवर युद्ध लढत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
बिपिन रावत यांचा जन्म दि. 16 मार्च 1958 रोजी पौडी, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील लक्ष्मण सिंग लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई उत्तरकाशी येथील रहिवासी होती, जी माजी आमदार किशनसिंग परमार यांची मुलगी होती. जनरल रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी होते.
त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बिपिन रावत, ज्यांना लष्करी बांधव 'बीरा' म्हणून ओळखले जायचे. ते सहकारी अधिकारी आणि सैनिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर सैनिकांसाठी उपलब्ध होता.
बिपीन रावत हे दि. 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि त्यांना संरक्षण दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भारतीय सैन्यदलासह संपूर्ण देशाचा अभिमान असलेल्या रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही देशासाठी दु:खद बातमी होती. त्यांचे कार्य, त्यांचे कर्तृत्व, नेहमीच प्रेरणा देत राहिल. जनरल बिपीन रावत यांना MBP Live24 चा सॅल्युट. तसेच सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह या अपघातात दिवंगत झालेल्या सर्व १३ जणांना श्रद्धांजली. जय हिंद.
- Adv. उमेश अनपट (मुख्य संपादक, MBP Live24)