अहमदनगर - कायम वादग्रस्त असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्याची डिटेक्शन ब्रँच (गुन्हे शोध पथक) बरखास्त करण्यात आली आहे. एका फौजदारासह तब्बल १६ कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. इतक्या जणांचे पथक बरखास्त झाल्यामुळे कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फौजदार मनोज कचरे यांच्यासह १६ अनुभवी, नव्या दमाच्या कर्मचार्यांचा कोतवालीच्या डिटेक्शन ब्रँचमध्ये समावेश होता. गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी अलीकडच्या काही काळात या डिटेक्शन ब्रँचमध्ये गटबाजी झाल्याचे सांगितले जात आहे. त्या परिणाम कामगिरीवर होऊ लागला होता.
इतक्या जणांची संख्या असूनही कोतवाली पोलिसांच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरींच्या गुन्ह्यांचे प्रमाण थांबायला तयार नाही. या गुन्ह्यांसह इतर दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात ‘या’ पथकाला अपयश आले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पथकच बरखास्त केले आहे.
आता पुन्हा नव्याने डिटेक्शन ब्रँच तयार केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अनुभवी, गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाईल, तसेच गुन्ह्याची उकल करण्यासावर व वाढते गुन्हे रोखण्यावर अधिक भर दिला जाईल, असे वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.