पालकमंत्री छगन भुजबळ यांना विश्वास
नाशिक : जिल्ह्यात शेती अनन्यसाधारण महत्व असून देशातील पहिली किसान एक्स्प्रेस रेल्वे नाशिक मधून सुरू होतेय हि अभिमानाची बाब आहे. किसान एक्सप्रेसच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
केंद्र सरकारच्या वतीने आज देवळाली ते दानापूर येथे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या किसान रेल्वेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ फार्म येथून सहभागी होताना बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगत असलेल्या नाशिक मधून आज पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकची निवड ही अत्यंत योग्य निवड आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की आज किसान रेल्वे चे उद्घाटन होत आहे. जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन अधिक होते, भाव बऱ्याच वेळा भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतात. तसेच शेतकरी आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या कमी होतील यात शंका नाही.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असते या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केलेला हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा नाशिक जिल्ह्याला अधिक होईल. भारत भरात अनेक किसान रेल्वे सुरू व्हाव्यात. या माध्यमातून देशातील विविध भाग जोडले जातील आणि शेतमालाचा पुरवठा होईल. देशातील विविध भागातील कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.