अलताफ कडकाले (सोलापूर) - 'खेलो इंडिया युथ गेम्स' पुणे विभागीय कबड्डी मुले व मुलींच्या गटात पुणे जिल्ह्यातील संघानी अहमदनगर जिल्ह्यातील संघावर मात करीत दुहेरी मुकुट संपादित केला.
कुमठा नाका जिल्हा क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा झाली. मुलींच्या अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड कला व क्रीडा मंडळ पुणे संघाने नेवासा येथील दादासाहेब हरिभाऊ घाडगे अहमदनगरवर २५-१७ अशी ८ गुणांनी मात केली.
मुलांचा अंतिम सामना वालचंद विद्यालय व ज्यु. कॉलेज कळंबा इंदापूर (जि. पुणे) विरुध्द दादासाहेब हरिभाऊ घाडगे नेवासा (अहमदनगर) यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरास १३-१९ अशी सहा गुणांची आघाडी पुणे संघाने घेतली होती.
मध्यांतरानंतर अहमदनगरने उत्कृष्ठ चढाया व पकडी करुन सामना खेचून आणला होता. परंतु शेवटच्या चढाईत पुण्याने हा सामना २९-२८ असा एका गुणांनी जिंकला. या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मदन गायकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, राष्ट्रीय खेळाडू कासीम शेख, संतोष जाधव, गनी शेख आदी उपस्थित होते.