अहमदनगर - 'वंचित बहुजन आघाडी' कर्जत नगरपंचायत निवडणुक आखाड्यात पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. आता वंचित बहुजन आघाडीशिवाय कर्जत नगर पंचायतीत सत्ता काबीज करणे प्रस्थापित पक्षांना शक्य नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी केले आहे.
सोमनाथ हरी भैलुमे यांनी प्रभाग ९ - स्वामी समर्थनगर (सर्वसाधारण मतदारसंघ), अनिल विश्वनाथ समुद्र प्रभाग १५ - भवानीनगर सिद्धार्थनगर (अनूसुचित जाती मतदारसंघ) आणि निर्मला दिपक भैलुमे प्रभाग १६ - आक्काबाईनगर (अनुसूचित जाती स्री राखीव) हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत. वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तौसीफ शेख यांनी बलिदान दिले. या बलिदानाला आघाडी कधीच विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही, असे बारसे म्हणाले.
तौसीफ शेख कायम स्मरणात राहवे यासाठी त्यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून वक्फ बोर्डाच्या जमिनीवर व्यापारी संकुल उभारून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पैसा अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण व रोजगारासाठी खर्च करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
रस्ते, पाणी, वीज पुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, बेघरांना म्हाडा अंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी स्रीयांकरीता स्वतंत्र व पुरुषांकरीता स्वतंत्र स्वच्छालय निर्माण करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढत आहे.
कामगारांचे प्रश्न, नवी भरती, यासाठीही वंचित बहुजन आघाडी लढणार आहे, अशी ग्वाही जिल्हा संघटक नंदकुमार गाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे, चंद्रकांत डोलारे, सुरेश कोंडलकर, चंद्रकांत नेटके, तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.