'झिम्मा' हा शब्द कानी पडल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात गौराईसमोर आपलं सुखदुःख विसरुन मनसोक्त खेळणा-या मुली...बायका..! तसे हेमंत ढोबेचा पोस्टर गर्ल ..आणि इतर विनोदी अंगाने जाणारे चित्रपट पाहिलेत. हलकेफुलके..! तो दिग्दर्शक म्हणून छानच.. पण हा वेगळ्या ढंगाचा चित्रपट काढण्यात अन हाताळण्यात दोघेही पतीपत्नी यशस्वी झालेत.
ह्या सिनेमाची कथाही हलकीफुलकीच. पण कमालीचे गोड संवाद याने सिनेमा कमालीचा सशक्त झालाय. यातील पात्रांच्या निवडीला अगदी शंभर मार्क. निर्मिती सावंत म्हणजे अभिनयाची शाळा. या सिनेमात त्यांनी कमाल केलीय. अर्थात 'जाऊबाई जोरात' पासून 'या' बाईंच्या प्रेमात आहे.
सुहास जोशी लईच भारी. जगरहाटीप्रमाणे गळ्यात पडलेला संसार इमानेइतबारे केलाय पण... स्वतःचीही काही जगण्याविषयीची स्वप्नं आसतात की बाईची.. सुचित्रा बांदेकर बरोबरच्या एका सीनमध्ये दोघींचीही वेदना न कळत वर येते.पूर्ण चित्रपटभर सुचित्रा बांदेकर गोड दिसतातच. पण त्यांचे सारे सीन मस्त.
त्यांची मुलगी झालेली सोनाली.. आपल्याला काय हवय हे न कळलेली मग रस्ता चुकता चुकता योग्य वळणावर पोहचलेली.. मृण्मयी गोडबोलेची गुजराथी बाहेर जाताना घरांच्या काळजीची घालमेल छान दाखवलीय..गृहिणी अशीच असते ना....!
या चित्रपटाची निर्माती क्षिती जोग.. आत्मविश्वास नसलेली मनात वेदना घेऊन जगणारी स्त्री.. तिचा अन् निर्मितीताईंचा चर्चमधील सीन असो किंवा हरवल्यावर भेदरलेली ती क्षितीने अफलातून उभी केलीय. तिला तिची ती स्वत: सापडते ना, तेव्हा ती झपाट्याने पाय-या चढते ना तो दिग्दर्शकाचा खास टच...!
बीचवरील सा-यांचे सीन भारीच आहेत. यात सॅनिटरी नॅपकीनची जाहिरात दाखवलीय उत्तम अभिनेत्रीं असलेली सायली संजीव आणि सोनाली या दोघांनी या सीनमध्ये धमाल आणलीय.. स्त्रियांच्या साध्याशा दिसणाऱ्या पण पण ते टोचणारे कोपरे..
सधन समाजातील स्त्रियांच्या वर जोक्स मुर्ख लोक करत असतात. पण त्यांचे हे टोचणारे कोपरे कुणालाच दिसत नाहीत. यात त्या गंमत म्हणून सा-याजणी दारु पितात.. दारु पिणं वाईटच हो पण त्या कांही दारुड्या नैत. आणि लोकशाहीमध्ये ज्याला जे वाटत ते करु द्या ना... आपण कोण सल्ले देणारे.?
आपण समतेचा ढोल कितीही वाजवला तरी आपण म्हणजे स्त्री दुसऱ्यां क्रमांकावरच आहे. असो. ट्रीपला आल्यावर करु देना तिला हवं ते... समाजाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी एकट्या स्त्रीची थोडीच आहे.? ह्या लॉंग ट्रीपला गेलेल्या सख्यांची धमाल आहे. लोकेशन लंडनचे पण आपणही फिरुन येतो या सख्यांबरोबर..
फोटोग्राफी मस्त. हेमंत ढोबेंनी उत्तम दिग्दर्शनाबरोबर छोटासा रोल केलाय. साधासा नोकरदार बायकोच्या स्पेसची कदर करणारा मस्त निभावलाय. सिध्दार्थ चांदेकर दिसतो गोड, कामही गोड...! अशी स्पेस स्त्रीला मिळायला हवी. कारण तिच्या अनुभवाचा परीघ मोठा झाला तर तिला तिच्या समस्या, समस्या वाटणारच नाहीत.
ताकदीचे पण मार्मिक संवाद, अचूक स्टारकास्ट. निर्मितीताईंचा अन सिध्दार्थचा सीन चटकन संपतो पण सिध्दार्थला एक नजर देऊन. सायली अन् सुहास जोशींचे सीन... ह्या सा-या साठी हेमंत ढोमे या दिग्दर्शकाला सलाम.
हलकेफुलके पण काही अर्थपूर्ण खूप दिवसांनी पाहिले. घरातल्या आई बहिणींना हो बायकोलाही जाणून घ्यायचं असेल तर जरुर पहा...! आणि हो.. चित्रपट संपल्यानंतर उठून बाहेर पडायची घाई नको, ते वॉटसअप चॅट दाखवलेय ते जरुर पहा.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)