अहमदनगर - औरंगाबाद कारागृह पोलिस दल भरतीसाठी आयोजित केलेली लेखी परीक्षा रविवारी नगर शहरात पार पडली. यावेळी चक्क आयफोन आणि सोशल मिडियाचा वापर करीत एका उमदेवाराने या पेपरची प्रश्नपत्रिकाच लीक केली. जालना जिल्ह्यातील या उमेदवाराला नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
विकास परमसिंग बारवाल (रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना) असे या उमेदवाराचे नाव आहे. रेसिडेंशिअल हायस्कूलमध्ये शनिवारी लेखी परीक्षा होती. यावेळी उमेदवारांना मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे आत नेण्यास बंदी होती. तरीही विकासने पायाच्या चपलेत लपवून छोट्या आकाराचा फोन आत नेला.
परीक्षा सुरू झाल्यानंतर विकास वारंवार कानाला हात लावत असल्याचे पर्यवेक्षिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जवळ येऊन पाहिले असता विकासच्या कानात अत्यंत बारीक आकाराचा इअरफाेन त्यांना दिसला. त्यांनी ताबडतोब परीक्षा समन्वयकांना बोलावून त्यांना हा प्रकार दाखवला.
विकासची तपासणी केली असता त्याच्याकडे छोट्या आकाराचा आयफोन आढळला. त्यामुळे विकासला ताेफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी फोन तपासला असता विकासने प्रश्नपत्रिका एका व्हॉट्स अप ग्रुपला सेंड केलेले दिसून आले. त्यात तिघा जणांचा समावेश होता.
तोफखाना पोलिसांनी विकास बारवाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी विकासला रविवारी न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्याच्या तपासाकरिता त्याला पोलिस कोठडीची विनंती केली.
पेपर लीक करण्याच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते. त्यामुळे याद्वारे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता न्यायालयाने विकासची पोलिस कोठडीत रवानगी केली. विकासला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.