अलताफ कडकाले (सोलापूर) - महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे सोलापुरात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जगभरातील महिला टेनिस खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिव्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्यातर्फे या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
विजेत्याला तब्बल १५ हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस असून सोलापुरातील कुंठनाका येथील टेनिस सेंटर येथे सोमवारपासून ही स्पर्धा रंगणार आहे. जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे सहाव्यांदा सोलापुरात आयोजन केले असून या स्पर्धेत ६ विदेशी खेळांडूंसहा एकूण ५६ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे.
कोरोनानंतर प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले असल्याने मानांकनासाठी ही स्पर्धा फार महत्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत अमेरिका, दक्षिण कोरिया, रशिया, जर्मनी या देशातील महिला खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. राज्यात व जिल्ह्यात लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आंतराष्ट्रीय लॉन टेनिस फेडरेशनने मुंबईच्या नितीन कन्नावर यांची सामना पर्यवेक्षक तर राज्यसंघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले व रोहित बालगवी(पुणे), सेकत रॉय व सुरजित बंडोपाध्याय (कलकत्ता ), लावली रैझान (मुंबई ) व साक्षी चंग (चंदीगड) यांची पंच म्हणून निवड केलेली आहे.
या स्पर्धेचे उदघाटन सोमवारी (ता.६) दुपारी ५ वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. उद्यापासून पात्रता फेरी तर ७ डिसेंबरपासून मुख्य सामन्यांना सुरवात होणार आहे.