'तिरकस आणि चौकस' - आपल्या संवेदना हरवल्यात का..?

गजानन घोंगडे यांनी 'तिरकस आणि चौकस' या सदरासाठी रेखाटलेले एक व्यंगचित्र सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल हाेतंय. बहुधा ते वर्तमानपत्र, मासिक किंवा सायंदैनिकासाठी रेखाटलेले असावे. पण, त्यातलं व्यंग आणि आजच्या परिस्थितीवर केलेलं भाष्य आपल्या अंतर्मुख करायला लावतं.

या व्यंगचित्रात दोन वाघ त्यांनी दाखवले आहेत. एक वाघ घाबरून खाली बसलेला, तर दुसरा वाघ त्याच्या शेजारी उभा दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत आहे. या व्यंगचित्राखाली दोन वाघांमधल्या संवादाच्या दोन ओळी लिहिल्या आहेत. त्या मात्र खूप मार्मिक आहेत.

या व्यंगचित्रातील एक वाघ दुसऱ्या वाघाला काय म्हणतो, ते सांगितलं आहे. 'ते आपल्याला पहायला आले की आपण शांत उभं रहायचं. अन् आपण त्यांना पहायला गेलो की गावभर बाेंबाबोंब'. अशा ओळी या व्यंगचित्राखाली लिहिलेल्या आहेत. हा दाेन वाघांमधला संवाद आहे.

हे एका वाघाचं दुसऱ्या वाघाला जे सांगणं आहे ते सध्याची परिस्थिती पाहता विनोदी असेलही, पण मार्मिक देखील आहे. मनुष्यप्राण्यात एकट्याने जंगलात जाऊन वाघाला पहायची हिंमत नाही. पण, वाघ एकट्याने आपल्या जंगलात (मनुष्य वस्तीत) आला, की तेव्हा मात्र त्याला सळो की पळो करून सोडलं जातं.

वाघ (बिबट्या) मानवी वस्तीत आल्यावर जो हलकल्लोळ माजतो, किंवा त्याला डिवचून आणखी घाबरून सोडलं जातं ते माणसांच्याच अंगलट येतं. अगदी हेच घोंगडे त्यांच्या व्यंगचित्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे व्यंगचित्र पाहून आपल्याला हसू येणार असेल, तर विचार करण्याची गरज आहे.

समकालीन व्यक्ती, घटना, प्रसंगामध्ये दडलेल्या 'विसंगत' स्वरूपाच्या अर्थाचे म्हणजे सूचितार्थाचे हास्यजनक प्रकटीकरण करणारे चित्र, म्हणजे व्यंगचित्र. पाहताक्षणीच हसवणारे, पण त्यासोबत उपरोधिक मार्मिक भाष्य करणारे चित्र, एका क्षणात हसवणारे, तर दुसऱ्याच क्षणी अंतर्मुख करणारे चित्र, म्हणजे व्यंगचित्र.

घोंगडे यांनी रेखाटलेले दोन वाघ जे एकमेकांशी बोलत आहेत, ते वाचून सहज हसू येतं. पण, पुढच्या क्षणाला आपल्याला त्यातली 'ब्लॅक कॉमेडी' कळत नसेल तर मात्र आश्चर्य आहे. प्रत्येक व्यंगचित्र हसवण्यासाठीच असतं असंही नाही. त्यातून मार्मिक संदेश देण्याचाही प्रयत्न केलेला असतो.

या व्यंगचित्रातलं वाघाचं मनोगत हे वास्तव तर आहेत, त्याहून अधिक तो उपहास आहे. दोन सजीव प्राण्यांमधील वागण्यातला विरोधाभास आहे. ते 'सटायर' आहे. ती 'ब्लॅक काॅमेडी' आहे. हे ज्यांना कळत नाही, अशा मनुष्यप्रााण्यांना खरोखर सजीव म्हणून एकमेकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य, यावर विचार करण्याची गरज आहे. कारण गजानन घोंगडे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र फक्त हास्यचित्र नक्कीच नाही.

- रवी भागवत (प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार, श्रीरामपूर, जि. अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !