क्षण.. क्षण.. क्षण..! खरंच 'प्रत्येक' क्षण हा आयुष्यच असतो ना..! क्षणांची ही पाखरे कशी भुर्रकन उडून जातात. काही क्षणांची भावनांमध्ये सुंदर गुंफण होते तर काही क्षण निःशब्द होवून राहतात. अन भविष्यात 'कहाणी' बनतात. काही क्षण सोबतच वादळांना पण हातात हात घालून घेवून येतात. आणि मनाचा सारा पसाराच उधळून लावतात अन वास्तवाची जाणीव करून देतात.
कधी कधी असा प्रश्न पडतो की हा मनाचा डाव, कल्पना, स्वप्न यांचा गाव कुठे आहे नेमका..? मनाच्या गाभाऱ्यात, स्वप्नांच्या सोनेरी पंखात, की ओल्याचिंब पापण्यात. कुठे आहे.? जीवनाचा रंग पुन्हा पुन्हा फिका का होतो, क्षण तर तेच सोबत करतात. मग त्यांची साथ न सोडण्याचा अटोकाट प्रयत्न केला तरी सूर का गवसत नाही.? का..?
कारण क्षणांच्या प्रवाही लाटा कितीही प्रयत्न केला तरी, कितीही आवरल्या तरी मनात उसळतातच. कसा सोडवावा हा गुंता.. त्या आठवणींच्या नाजूक क्षणांचा..! हा मनाचा पराभव मानावा का..?
पण वेदनांनो, तुम्ही कितीही बहरण्याचा प्रयत्न केला ना, तरी मनाच्या अंगणात बहरणार नाहीत. कारण आठवणींचे क्षण सोबत घेवून त्यांना मखमली भरजरी वस्त्रात सांभाळून सोनेरी क्षण साजरा करायचा आहे. हो तोच तो. प्रत्येक क्षण. मग हळूहळू का होईना, हा वेदनांच्या क्षणांचा गुंता सुटणारच.
कधी कधी अबोल क्षणही शब्दांतून ओसंडून वहातात. आठवणींच्या प्रवाहात हेलकावे खातात, तर कधी अंतरंगाच्या तळाशी मोत्यांचे क्षण वेचतात.
सुख म्हणजे तरी नेमकं काय असतं.? प्रत्येक क्षणाला विचार करण्याची शक्ती परमेश्वराने आपल्याला दिली आहे. मनोविश्वावतल्या भास-आभासांच्या दुनियेत वास्तवातील नातीगोती सांभाळणं म्हणजे सुख. खरंतर मनाचा कोपरा हा अशा क्षणांनी गजबजलेला असावा नेहमी. पण तरीही एकांतातील क्षणही कधी कधी खूप प्रिय वाटतो.
हसण्याचा क्षण.. मुसमुसण्याचा.. मोकळं होण्याचा क्षण.. हे सारे क्षण म्हणजे तटतटलेल्या मनवाहिण्या मोकळं करतात आणि जगण्याला ऊर्जा देतात. अनेकदा डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवर चालणाऱ्याला जसा तोल सांभाळायला काठी मदत करते ना, तसे आयुष्यात भावनांचा तोल सांभाळायला, सावरायला काही क्षण काठी बनतात.
आणि ही तारेवरची कसरत आयुष्यभर अविरतपणे चालू राहते. नव्हे ती राहणारच आहे. आणि त्यासाठी ती काठी स्वतःलाच निर्माण करायची आहे. क्षणांमधून क्षण वेचून.. आयुष्याची सुंदर बाग फुलवायची आहे. शेवटी काय ? तर..
क्षण वेचता वेचता,
सगळं काही कळालं..
उंच उडण्यासाठी,
पंखाना बळ मिळालं..
- छाया रसाळ (अहमदनगर)