अहमदनगर - एका गावात राहत्या घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये कोणी घबाड लपवून ठेवेल, असे कोणालाही वाटणार नाही. परंतु, तिघा जणांनी नेमके अशाच ठिकाणी लाखोंचा सुगंधी पानमसाला लपवून ठेवला होता. थोडा थिडका नाही, तर तब्बल पावणे तीन लाख रुपयांचा हा माल होता.
याची कुणकुण पोलिसांना लागली. अन् कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त छापा टाकला. तेथून २ लाख ७६ हजार रूपयांचा गुटखा व तंबाखू पकडली आहे. ही कारवाई जामखेड तालुक्यातील धोत्री गावामध्ये करण्यात आली. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी रामकिसन ऊर्फ बाबु उत्तम अडाले (वय २६, रा. धोत्री ता. जामखेड), सचिन निवृत्ती गायकवाड (वय ३१, रा. जामखेड) व संजय सुभाष जगताप (रा. वाणेवाडी, ता. पाटोदा जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
धोत्रे गावच्या शिवारात रामकिसन अडाले याने त्याच्या दोन मित्रांसमवेत राहत्या घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने छापा टाकला.
पोलिसांनी अडाले याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून तपासणी केली. त्यावेळी तेथे हिरा पानमसाला गुटखा व तंबाखू असा २ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आता जामखेड पोलिस करीत आहेत.