अहमदनगर - जिल्ह्यातील घोडेगाव (ता. नेवासा) येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची कार्यवाही सुरू आहे. सरपंच राजेंद्र देसर्डा व गावचे पोलिस पाटील बाबासाहेब वैरागर यांनी ही माहिती दिली आहे. त्यासाठी गावातील जास्तीत जास्त नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचे संकलन केले जात आहे.
घोडेगाव हे नगर औरंगाबाद महामार्गावर असलेले मोठ्या लाेकसंख्येचे गाव आहे. गावात ये-जा करण्यासाठी महामार्गासह एकूण ७ प्रमुख रस्ते आहेत. गावाच्या मध्यवर्ती भागासह शेतात व मळ्यात राहणाऱ्या लोकांची संख्याही अधिक आहे. गावात चोरट्यांचा उपद्रव नेहमीचाच आहे.
गावातील प्रमुख चौकांमध्ये व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. आता ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गावातील अधिकाधिक नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचे संकलन केले आहे.
यासाठी गावातील जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस पाटील बाबासाहेब वैरागर यांच्या आवाजातील ध्वनीफित असलेला फोन नागरिकांना येत आहे. या ध्वनीफितीमध्ये ते ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती देतात. तसेच मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन करतात.
काय आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा - गावात कुठे चोर आले, बिबट्या आला, तर ग्राम सुरक्षा यंत्रणेकडे माहिती कळवली जाते. तेथून एकाच वेळी हा संदेश गावात सर्वांना कळवून सावध राहण्यास सांगितले जाते. तसेच ही माहिती प्रशासनाला कळवून तत्काळ मदतीसाठी पाचारण केले जाते.
जिल्ह्यात बहुतांश गावांनी ही यंत्रणा त्यांच्या गावात कार्यान्वित केलेली आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून आलेले आहेत. ग्राामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घोडेगाव ग्रामपंचायतीने आता यासाठी पुढाकार घेतला आहे. ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सरपंच राजेंद्र देसर्डा यांनी दिली आहे.