अहमदनगर - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बोल्हेगाव परिसरात राहणाऱ्या एका पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोकाटे याने आपल्या मुलांना व कुटुंबियांना चाकूने ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत म्हटले आहे.
गोविंद मोकाटे याने फेसबुकवरून पीडित महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिने स्वीकारली नाही, म्हणून वारंवार तिला मेसेज केले. सोशल अॅप्सवरून काॅल करुन तिच्याशी अश्लील संभाषण केले. तसेच एक दिवस महिलेच्या पतीची ओळख काढून तिच्या घरी आला.
घरात येऊन बसलेल्या मोकाटेला चहा देण्यासाठी पीडित महिला समाेर आली असता, त्याने 'मला ओळखले का, असे विचारले. महिलेच्या पतीकडे तो वारंवार यायचा. एकदा पती घरी नसताना गोविंद मोकाटे घरी गेला. त्याने तिची बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतरही महिलेला धमकावत राहिला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पतीला व मुलांना मारून टाकीन असेही धमकावले. 'तुला माहित नाही, मी कोण आहे, मला नाही ऐकायची सवय नाही. तु माझे ऐकले नाही तर तुझ्या पतीला आपले अफेअर आहे, असे सांगेन', अशी धमकी मोकाटे द्यायचा.
एक दिवस महिलेने गाेविंद मोकाटे घरात आल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ शुटिंग केले. त्यानंतर तिने सामाजिक कार्यकर्ते सुशांत म्हस्के यांच्याकडे जाऊन मदत मागितली. सुशांत म्हस्के यांनी पीडित महिलेला घेऊन तोफखाना पोलिस ठाणे गाठले. तेथे या पीडित महिेलेने गोविंद मोकाटेविरुद्ध फिर्याद दिली.
गाेविंद मोकाटे याच्याविरूद्ध बलात्कार व धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ताेफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रणदिवे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. गोविंद मोकाटे हा सध्या फरार झाला असल्याचे समजते.
ही बातमीही वाचा - 'गोविंद मोकाटे' प्रकरणी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, याद राखा जर..