श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - सिनेअभिनेते भारत फुलमाळी यांना नुकताच 'राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार' प्रदान करण्यात आला. शब्दगंध साहित्यिक परिषद व लोकरंग बहुद्देशीय संस्था, वडाळा महादेव यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. सिनेसृष्टीत अल्पावधीत उत्तुंंग यशाला गवसणी घातल्याबद्दल फुलमाळी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्रीरामपूर येथे नुकत्याच झालेल्या साहित्यिक सन्मान सोहळ्यात श्री. बाबा आरगडे व इतर मान्यवरांच्या हस्ते भारत फुलमाळी यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारत फुलमाळी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर चिकाटीने मात केली. त्यांना नुकताच 'दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड'ही प्रदान करण्यात आलेला आहे. त्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला.
सन्मानपत्रात म्हटले आहे की, 'आपण भटक्या विमुक्त समाजात सर्वसाधारण जीवन जगत असताना तारेवरची कसरत केली. टीचभर पाेटपाण्यासाठी गावोगाव भटकंती करणारा समाज असला तरी एखादी कला जोपासणे ही मोठी पुण्याई आहे..'
'आपण फिल्मसिटीमध्ये सिने अभिनेते म्हणून खूप मोठा नावलौकिक मिळवला आहे. आपण अहमदनगर जिल्ह्याचे भूषण झाले आहातच, पण संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला सिने कलाकार म्हणून ओळखतो, याचा आम्हाला अभिमान आहे', असे गौरवोद्गार या सन्मानपत्रात आहेत.
'आपणास नुकताच दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार' मिळाला आहे. त्यामुळे आपल्या या कार्याच्या गौरवार्थ आपणांस संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त हा सन्मान प्रदान केला जात आहे.' असेही या सन्मानपत्रात म्हटले आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिराबक्ष शेख, सचिव आनंदा साळवे, यांनी हा पुरस्कार दिला.
सिने कलाकार भारत फुलमाळी यांच्यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांनाही यावेळी सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारत फुलमाळी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौेतुक व अभिनंदन केले जात आहे.
ही बातमी सुद्धा वाचा - सिनेअभिनेते भारत फुलमाळी यांना ‘दादासाहेब फाळके आयकाॅन फिल्म पुरस्कार’