रूग्णांच्या जीवावर उठलेले डॉक्टरच्या वेशातील 'हे' जल्लाद

राज्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, मुबई, नागपूर सर्वच ठिकाणी वैद्यकीय सेवेचा व्यवसायरुपी बाजार मांडून काही डॉक्टर मंडळी कोरोना रुग्णांची गिधाडासारखे लचके तोडताना दिसत आहेत. 

बोटावर मोजण्याइतपत घटनांच्या माध्यमातून हे समोर आलेलं वास्तवच एव्हढं भयाण आहे, तर मग डोळ्याआड रुग्णांची किती मोठ्या प्रमाणात लूट सुरू असेल याचा विचार न केलेलाच बरा. 

'लॉकडाऊन'च्या दणक्याने आधीच व्यवसाय, नोकऱ्या गेल्याने आर्थिक कणा मोडलेला आहे. त्यात अशा लोकांवर डॉक्टरांकडून होणारे 'हे' हल्ले कशाचे द्योतक आहे..?

आधी 'सेवा' म्हणून ओळखला जाणारा हा 'वैद्यकीय व्यवसाय' आता हॉस्पिटलच्या मोठ्या इमारतीत जाऊन नुसता 'धंदा' बनलाय. या चकाचक हॉस्पिटलमध्ये पेशंटकडे फक्त 'कमाई' म्हणून पाहिले जातेय, ही मोठी शोकांतिकाच आहे. 

औषधे व विविध प्रकारच्या 'टेस्ट' यामधून 'कमिशन' रूपाने भरमसाठ 'मलिदा' डॉक्टरला चरायला मिळतो. याउपर विविध प्रकारचे 'चार्ज' लावून 'बिल'रूपाने पैसे रुग्णाकडून उकळले जातात ते वेगळेच. रुग्ण एकच, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा खिसा नियोजनबद्ध रीतीने कापला जातो. 

कोरोना महामारी संकटाच्या काळात तर काही डॉक्टरांनी पुरती 'लाज' सोडून रुग्णांची लूट करण्याचा धडाका लावलाय. या घटना प्रचंड चीड आणणाऱ्या आहेत.

अहमदनगर मधील भिंगार येथील डॉ. म्हस्के दांपत्य यांनी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा केल्याचे आढळले. हॉस्पिटलमध्ये 'रेड' मारली तर हे डॉक्टर दांपत्य गायब झाले. नाशिक मधील सदगुरू हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर 1200 रुपयाचे इंजेक्शन थेट 25 हजार रुपयाला विकताना पकडले गेले. 

तर शिरूरमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उघडून बसलेला बोगस डॉक्टर 'मुन्नाभाई' निघाला. त्याने नांदेड येथून येऊन दोन वर्षांपासून हा गोरखधंदा मांडला होता. मात्र आरोग्य प्रशासनास याची 'खबर' नव्हती, असे म्हणतात. तसेच नाशिक मधील अशोका हॉस्पिटलमध्ये 'रेमडिसिव्हीर'चा साठा आढळून आला. 

कोट्यवधी रुपये खर्चून काही दिवसांपूर्वीच हे 'आलिशान' हॉस्पिटल उभारण्यात आलंय. नाशिक शहरातीलच नाशिकरोड येथील दिव्यज्योत हॉस्पिटलमध्ये ६ हजार रुपयांच्या मेडिकलचे बिल तब्बल २६ हजार लावल्याचा व्हिडीओ 'व्हायरल' होतोय. नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनीच अखेर ही बाब उघडकीस आणली.

मेडिकलमधूनही डॉक्टरची 'खंडणी'

शासनाने कोविड रुग्णांच्या बीलातील बेड चार्ज, ऑक्सिजन चार्ज, आयसीयू, रेमडिसिव्हीर इंजेक्शन, पीपीई किट, मेडिकल अशा प्रत्येक गोष्टीची किंमत निश्चित करून दिली आहे. तरी देखील अजूनही रुग्णांची लूट सुरुच आहे. मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधे आणि सर्जिकलची बिले लावली जातात. 

यातून जमा होणारी माया 'खंडणीखोर' डॉक्टरला 'हप्ता' म्हणून द्यावी लागतेय. रुग्ण आणि नातेवाईकांच्या  निशाण्यावर मात्र मेडिकलवाला असतो. याचाही सारासार विचार व्हायलाच हवा.

'टेस्ट' बनल्या डॉक्टरसाठी बेस्ट

रक्त, लघवी, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन आदी टेस्ट डॉक्टर साठी 'बेस्ट' बनल्या आहेत. कारण रूग्णांच्या या टेस्ट केल्यावर प्रत्येक 'टेस्ट'मागे 'कमिशन'च्या रूपाने डॉक्टरला ठरलेला 'मलिदा' मिळतो.

कधी थांबणार हे दुष्टचक्र ?

वैद्यकीय सेवेत सुरू असलेल्या रुग्णांच्या लूटमारीचे दुष्टचक्र थांबणार कधी? या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली प्रशासनाची आरोग्य यंत्रणा आपल्या कुंभकर्णी झोपेतून कधी जागी होणार, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला गहण प्रश्न आहे.

- ऍड. उमेश अनपट
(लेखक 'एमबीपी लाईव्ह24' चे मुख्य संपादक आहेत.)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !