अहमदनगर - श्रीरामपूर येथे रविवारी सकाळी एका बिबट्याने मोरगे वस्तीत धुमाकूळ घातला. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आले. त्यांनी छतावर चढून एका काठीच्या अन् कुऱ्हाडीच्या साह्याने बिबट्याला जेरबंद करायचे धाडस दाखवले. या प्रयत्नांमुळे बिबट्या जाळ्यात सापडला खरा. पण, तीन दिवसांनी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
श्रीरामपूरच्या मोरगे वस्ती परिसरात रविवारी ५ डिसेंबरच्या सकाळी बिबट्याने भरवस्तीत प्रवेश करून दहशत घातली होती. सुमारे चार ते पाच तासांच्या थरारानंतर पोलिस, महसूल व वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या बिबट्यास जेरबंद केले. कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूरचे असे सुमारे २५ वन कर्मचाऱ्यांच्या टीमने यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पण, या झटापटीत राहुरी वनपरीक्षेत्रात कार्यरत असलेले लक्ष्मण गणपत किणकर हे जबर जखमी झाले होते. त्यांचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नगर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्यावर श्रीरामपूर तालुक्यातील त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सकाळी या बिबट्याच्या हल्ल्यात आणखी सात जण जखमी झाले आहेत. या सर्वानी काळजीपूर्वक उपचार घ्यावेत. घाबरून जाऊ नये, उपचाराच्या खर्चाची बिले सादर केल्यानंतर त्यांना तत्काळ खर्च अदा केला जाईल. उपचारासाठी कोणीही हयगय करू नये, असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.
वनसंरक्षक लक्ष्मण किणकर हे अतिशय धाडसी होते. त्यांनी यापूर्वीही शेकडो बिबटे पकडलेले आहेत. पण, रविवारचा प्रसंग जीवघेणा होता. आजवर वन कर्मचाऱ्यांवरही अनेकदा हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच कर्मचाऱ्याचा असा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.