नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. त्यामुळे त्यांची याच आठवड्यात चौकशी होऊ शकते. दरम्यान, यामध्ये आता दिपीका पदुकोणचेही नाव समोर येत असल्याचे प्रसारमाध्यमांतून दाखवले जात आहे.
एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकाेणलाही समन्स बजावले जाऊ शकते. ड्रग्जशी संबंधित व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. एनसीबीने सोमवारी सुशांतची मॅनेजर श्रुती माेदी व टॅलेंट मॅनेजर जया साहाची ५ तास चौकशी केली.
ड्रग्जबाबत २८ ऑक्टोबर २०१७ च्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये दीपिका पदुकाेणचे नाव आले आहे. यात ‘डी’ हा काेडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते. एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका “के’ला “माल’बाबत विचारत होती. अर्थात एनसीबी सुत्रांनी अदयाप याला दुजोरा दिलेला नाही. तसेच चॅटिंगमध्ये असलेले शब्द कोडवर्डमध्ये असल्याने नेमके कशाबद्दल बोलत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.