अहमदनगर - केंद्रातील भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, देश मोठ्या संकटातून जात आहे. केंद्र सरकार खाजगीकरणाचा घाट घालून, सर्वसामान्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधला जात आहे, असा आरोप करुन शेतकरी आंदोलनापुढे हुकुमशहा नमला आहे. आता नागरिकांनी जागे होण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात दराडे बोलत होते.
ते म्हणाले, सध्या देश मोठ्या संकटातून जात आहे. महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, जातीय तेढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहे. नोटाबंदी व जीएसटीनंतर अर्थव्यवस्था खिळखिळी झाली अहे.
जीडीपी नियंत्रणात नसून, रुपयाचे मुल्य दिवसंदिवस घसरत आहे. ही गंभीर परिस्थिती नागरिकांनी समजण्याची गरज आहे. देशाची ही अवस्था केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
बळीराजाला वर्षभर काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. अनेक आंदोलक शेतकरी शहीद झाले. तेव्हा कुठे कायदे मागे घेतले. प्रा. संजय कळमकर म्हणाले की, शेतकर्यांबद्दल जाणता नेता म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. बारामती पॅटर्न त्यांनी देशाला दिला.
सहकार क्षेत्राने दूरदृष्टी ठेऊन त्यांनी विकासात्मक व्हिजन महाराष्ट्राला दिले. समाजात काय चालले याचे भान ठेवणारा, सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध असलेला सामान्य माणसांपर्यंत नाते जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.