"मला एक सांगायचं होतं.. नोकरी, काम मिळेल तेव्हा मिळेल.. पण आजपासून मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरु करतोय". त्याचं हे वाक्य कानावर पडलं अन् चहाचा कप हातातल्या हातात राहिला. "हो. मी ठरवलंय, मला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे. त्याचा उपयोग करण्यासाठी मला आता दुसऱ्या कोणाची वाट नाही पहायची. मी माझं स्वत:चं काम आजपासून एकट्यानं सुरु करतोय...''
तो बोलत होता, हा ऐकत होता. हा क्षण 'क्रांतीकारक' होता. भविष्यात हाच क्षण ऐतिहासिक असणार, याची खूणगाठ याला पटली. कारण त्याच्या आयुष्यातले आजवरचे सगळे मळभ दूर सारणारा, मागचं सगळं पुसून टाकणारा तो क्षण होता. गेली काही वर्षे त्याने स्वत:चं आयुष्य मित्रांसाठी, कुटुंबासाठी आणि मदतीसाठी केविलवाणं तोंड समोर घेऊन येणाऱ्या प्रत्येकासाठी दिलं होतं.
त्याने सांगितलं की, "मी स्वत:चा व्यवसाय सुरु करतोय. काय करतोय, त्यात कधी यश मिळेल, माहित नाही. पण मी निर्णय घेतलाय". तो बोलत होता.. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. आणि तोच सर्वाधिक गरजेचा होता. आत्मविश्वास असणं, हेच महत्वाचं आहे. मग 'सक्सेस' मिळणं 'किस झाड की पत्ती..?'
अनेकदा मोठमोठ्या कॉर्पाेरेट कंपन्या आपल्या व्यवसायाचं जाळं विस्तारित करताना आधी मार्केटचा अभ्यास करतात. मग निर्णय घेतात. म्हणजे ज्या शहरात व्यवसाय सुरू करायचाय, तिथलं मार्केट कसं आहे, तिथे आपल्या व्यवसायाला यश मिळेल का, चांगलं ऑफिस किंवा' प्राईम लोकेशन' मिळेल का, जेणेकरुन आपला व्यवसाय ठळकपणे लोकांच्या नजरेत येईल, याचा विचार करतात. केलाच पाहिजे.
पण नवख्यांचं काय? कुठलाही ब्रँड, भांडवल आणि भक्कम साथ पाठीशी नसताना एखादा स्वतंत्र व्यवसाय किंवा काहीतरी नवं, पण फक्त स्वत:चं सुरु करण्याचा विचार करत असेल तर? त्याच्या लेखी मार्केट, मोक्याची जागा, प्राईम लोकेशन, या गोष्टी दूरच.. पण त्याने नुसतं बोलून जरी दाखवलं तरी हजार प्रश्न असतात.
"तु या फंदात कशाला पडतोय.., आता हेच राहिलं होतं का.., तु यापेक्षा ते का नाही करत..", वगैरे वगैरे सल्ले ऐकायला मिळतात. मुळात ज्याच्यात 'धमक' आहे त्यानेच निर्णय घ्यावेत. बाकीच्यांनी आयुष्यभर सल्ले ऐकत बसून त्यांचा संग्रह करुन विश्वकोष तयार करावा. नाहीतर काय.. नुसत्या सल्ल्यांचं काय लोणचं घालायचंय.?
सुरुवात महत्वाची असते. 'मी अमूक एक गोष्ट करणार', हा ठाम निर्णय घेणं, तीच गोष्ट करणार, हा निर्धार बोलून दाखवणं.. हेच तर सगळ्यात मोठं यश आहे. बाकी फायदा, नफा, यश वगैरे काय हो, आज ना उद्या हासील होणारच आहे. त्याआधी 'मी ही गोष्ट करतोय', हे स्वत:च्या मनाला निक्षून सांगणं हीच मोठी क्रांती असते.
बाकी अडचणी तर येत राहतील, त्यावर मात कशी करायची, या गोष्टी नंतरच्या आहेत. अडचणी आणि अडथळे कोणाला नाहीत.? पण जिथे आपल्या मनाचा निश्चय पक्का असेल. की मी ही गोष्ट करणारच, कारण मला ती माझ्या अंर्तमनाने सांगितलीय. तर मी त्यात 'सक्सेस' होणारंच.
निर्णयाचे परिणाम काय होतील, ते चांगले असतील की वाईट असतील, याचा विचार नक्कीच करावा. पण घेतलेला निर्णय योग्यच होता, हे सिद्धही करुन दाखवायचं. मग भोवतालचं जग आपोआप आपली 'सक्सेस स्टोरी' ऐकायला गोळा होतं. नाहीतर, कितीही 'वर्ल्ड फेमस' असलो, तरी आपला 'नोकिया' व्हायला वेळ लागत नाही.
मग..?
आहे ना तुमच्यात देखील धमक.?
घेताय ना तुम्हीही असा धाडसी निर्णय...?
'मंजिल मिल ही जायेगी एक दिन
भटकते-भटकते ही सही..!
लेकिन 'गुमराह' तो वो है,
जो घर से निकले ही नही..!
- एक कप 'चाय' हो जाये ?