अहमदनगर - स्वत:च्या सावत्र मुलीवर सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावली. इतकी वर्षे तिच्यावर अत्याचार करताना ज्याला काहीच वाटले नाही, त्या क्रूर सावत्र बापाच्या चेहऱ्यावर कोर्टाने शिक्षा सुनावली तरी कसलेही पश्चातापाचे भाव नव्हते.
महिला अत्याचारांच्या खटल्यात कामकाज पाहणाऱ्या विशेष सरकारी वकील मनीषा केळगेंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद केल्यामुळे या खटल्यात पीडित अल्पवयील मुलीला न्याय मिळू शकला. तब्बल सात वर्षे नराधम बापाचा अत्याचार सहन केल्यानंतर या मुलीनेच आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली होती. बोल्हेगाव उपनगरामध्ये ही पीडित मुलगी रहात होती.
नराधम बापच अत्याचार करतो हे समजल्यानंतर पीडित मुलीची आई तिला व लहान भावाला घेऊन औरंगाबादला गेली होती. तरी नराधमाने त्यांना शोधून परत आणले. एक दिवस पत्नीला मारहाण करुन घरातून हाकलून दिले. तेव्हापासून सातत्याने हा नराधम निरागस सावत्र मुलीला आपल्या वासनेचे शिकार करत होता.
अखेर पोलिस मदतीला धावले
सात वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मुलीने मार्च २०१९ मध्ये घर सोडून गेलेल्या आईला फोन केला. पण, तिला मदत मिळाली नाही. अखेर तिने १०० नंबर डायल करून पोलिस नियंत्रण कक्षाला आपली 'आपबिती' सांगितली. पोलिस तिच्या मदतीला धावले. तेव्हा या अत्याचाराला वाचा फुटली.
माणुसकीला काळीमा फासला - सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील मनीषा शिंदे म्हणाल्या, या खटल्यातील नराधम सावत्र बापाचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. एकीकडे लहान मुले पालकांकडे विश्वासाने सरंक्षणाची आस लावून असतात. पण या खटल्यात कुंपणानेच शेत खाल्ल्याचे सिद्ध होते. त्यामुळे मुलांच्या विश्वासाला तडा जातो. त्यांच्या मनावर परिणाम होऊन भविष्य धोक्यात येते. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करावी.
वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - तोफखाना पोलिस ठाण्याचे तत्कालीन फौजदार आर. आर. पांढरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात चार्जशिट दाखल केले होते. त्यांच्यासह पीडित मुलगी व इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.