छोटे मासे, मोठे मासे..

आज सुप्रसिद्ध लेखक वि.स.खांडेकर यांचा स्मृतीदिन. भाऊंचे लेखन म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल हिरेच. कथेला अलौकिक शब्दात साज चढवून एक विपुल ग्रंथसंपदा वाचकांसाठी ठेवली आहे. ययाती, अमृतवेल ही आणि कितीतरी. मला त्यांची अतिशय आवडणारी कथा देतेय. रुपकातून संदेश देणाऱ्या भाऊंना सखीसंपदा समुहाच्या वतीने विनम्र अभिवादन.  
     
वि. स. खांडेकर यांची 'मासे' नावाची एक गोष्ट आहे. त्यात एक मोठा मासा एका लहान माश्याला खायला जातो. तेव्हा लहान मासा त्या मोठ्या माश्याला म्हणतो की "दादा, आपण तर एकाच जातीचे, मला कशाला खाताय ?" तेव्हा मोठा मासा हसतो आणि म्हणतो की "अरे हा तर जगाचा न्याय आहे. मला भूक लागली, मी तुला खाणार." 

काही दिवसांनी एक भव्य मासा या मोठ्या माशाला खायला येतो. मोठा मासा भव्य माश्याला म्हणतो "दादा, आपण तर एकाच जातीचे, मला नका खाऊ." त्यावर तो भव्य मासा म्हणतो "तू फारच मुत्सद्दी आणि तत्वज्ञानी दिसतोयस रे.. पण याचा काही उपयोग नाही, मला भूक लागलीये आणि मी तुला खाणार."

यावेळी त्या मोठ्या माश्याला त्या लहान माश्याची आठवण येते. आपल्या समाजात सुद्धा असेच काहीसे चित्र आहे. लहान मासे आहेत, मोठे मासे आहेत आणि भव्य मासे सुद्धा आहेत. सर्वांना राजकीय, आर्थिक, भौतिक भूक लागलेली आहे. मोठ्या माश्यांना वाटत की लहान माश्यांना खाल्लं म्हणजे आपली भूक भागेल आणि समुद्रावर आपली सत्ता / वर्चस्व राहील.

पण त्या मोठ्या माश्यांना हे माहित नाही की त्यांच्यापेक्षाही मोठे आणि भव्य मासे समुद्रात आहेत ज्यांची भूक प्रचंड आहे आणि ते आज ना उद्या मोठ्या माश्यांना खाणार बाकी जात-धर्म हे सगळं थोतांड आहे. भूक लागली की मोठा लहानाला खाणार हेच सत्य आहे. कारण हा जगाचा न्याय आहे.
 
 - स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !