मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचेे त्यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल, असेे ते म्हणाले.
हा निर्णय म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” असे पवार म्हणाले.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असले तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे. शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा दिला आहे, अशा शब्दात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय होती पार्श्वभूमी - बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेे या शर्यतींना काही शर्तींवर परवानगी दिली आहे. याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे राज्यभरात स्वागत केले जात आहे.