अहमदनगर - वाळकी (ता. नगर) येथील सराईँत गुन्हेगार विश्वजित रमेश कासार याच्यासह नऊ जणांविराेधात माेक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कासाच्या विराेधात खून, दराेडा, जबरी चाेरी, फसवणूक असे २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटताच ताे वारंवार गुन्हे करायचा.
या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई
- विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर)
- सुनील फक्कड अडसरे (फरार, रा. शेडका, ता. आष्टी)
- शुभम बाळासाहेब लाेखंडे (फरार, रा. करडे, ता. शिरूर, पुणे)
- सचिन भामरे (फरार, रा. खेतमाळीसवाडी, ता. श्रीगाेंदे)
- इंद्रजित रमेश कासार (अटक, रा. वाळकी, ता. नगर)
- मयूर बापूसाहेब नाईक (अटक, रा. वाळकी)
- भारत भिमाजी पवार (फरार, रा. दहिगाव साकूत, ता. नगर)
- संताेष भाऊसाहेब धाेत्रे (अटक, रा. कामरगाव)
- संकेत भाऊसाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. नगर)
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कासारच्या या टाेळीतील चार आराेपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनाही त्याने जेरीस आणलेले आहे. वाळकी ग्रामस्थांनी त्याच्या अटकेसाठी अनेकदा आंदोलने केली होती.
कासारच्या टाेळीने काही दिवसांपूर्वी वाळकी येथे एका युवकाचा खून केला हाेता. त्यापूर्वी दराेडा, जबरी चाेरी, फसवणुकीचे अनेक गुन्हेही केले आहेत. एका गुन्ह्यात जामीन मिळताच कासार पुन्हा दुसरा गुन्हा करत हाेता. त्याने एका शेतकर्याची फसवणूक करत त्याच्या नावावर बुलेट, अक्टिव्हा, सुझुकी, अशा गाड्या घेतल्या हाेत्या. बजाज फायनान्सचा अधिकारी असल्याचे त्याने सांगितले हाेते.
या गुन्ह्यातही अटक केल्यानंतर तो पुन्हा जामिनावर सुटला. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच होती. काही दिवसांपूर्वी वाळकी येथे झालेल्या खून प्रकरणात पाेलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासह त्याच्या टाेळीविराेधात माेक्काचा प्रस्ताव तयार केला.
बनावट सैन्यभरती, रेल्वेभरती ?
सराईत गुन्हेगार विश्वजित कासार याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सन २०१३ मध्ये त्याने चक्क बनावट सैन्यभरती केली हाेती. तरुणांना कर्नल बनवण्याचे स्वप्न दाखवत त्यांना स्वत:च प्रशिक्षण दिले. रेल्वेभरतीच्या नावावरही अनेकांना फसवले. याप्रकरणी रेल्वे पाेलिसांनीही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.