धुळे - पंजाबच्या दोन आरोपींनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. आरोपींनी हातकडीसह काठीने मारहाण करत पोलिसांना चावा घेतला व पोलिस व्हॅनमधून उडी मारून पलायन केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह दोघे जण गंभीर जखमी झाले. तर इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. हा सिनेस्टाईल थरार सुरत-नागपूर महामार्गावर कुसुंबा गावाच्या शिवारात रस्त्यावर घडला. या दोन्ही आरोपींवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नांदेड शहर विमानतळ पोलिस ठाण्याचे फौजदार एकनाथ देवके यांनी फिर्याद दिली आहे. नवप्रीतसिंग तारेसिंग उर्फ मनदिपसिग सुरजीतसिंग जाट (रा. पो. जस्तरवाल ता. अजनाला जि. अमृतसर, पंजाब) व मोहित उर्फ मनी विजय शर्मा (रा. गल्ली नं. ३. बाटलारोड, प्रीतनगर ता. जि. अमृतसर, पंजाब) यांनी पलायन केले आहे.
या दोघांवर मोटारसायकल लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील मोटारसायकल मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे ट्रांझिट रिमांड घेऊन पोलिस आराेपींना घेऊन जात होते. नांदेड येथून फौजदार देवके यांच्यासह रत्नसागर कदम, नाथराव मुंढे, साईनाथ सोनसळे हे शासकीय वाहनाने आरोपींना आणत होते.
पोलिसांचे पथक धुळे जिल्ह्यात कुसुंबा गावाचे पुढे आले असता दोन्ही आरोपींनी अचानक पोलिस पथकावर हल्ला केला. हातातील बेड्यांनी पोलिस कर्मचारी मुंढे यांच्या डोक्याला मारहाण केली. त्यामुळे यांचे डोके फुटून रक्त येऊ लागले. गाडीतील काठीनेही त्यांनी पोलिसांना मारहाण केली.
याप्रकरणी फौजदार देवके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, पोलिस कस्टडीतून पळून जाणे, आदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.