पिंपरी-चिंचवड : मोशी (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील 'ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड' या नेटवर्क मार्केटींग कंपनीने राज्यातील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणाची पिंपरी-चिंचवड चे डॅशिंग पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गंभीरपणे दखल घेत तपासाची चक्रे फिरवून चौघा जणांना ता. 22 ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने चौघांना ही पाच दिवसांची (26 एप्रिल पर्यत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे 'ड्रीमव्हिजन' कंपनीकडून फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 'MBP LIVE 24' ने या प्रकरणावर 'प्रकाश' टाकला होता.
बीड जिल्ह्यातील प्रचंड दादासाहेब भुसारे (वय 42, रा. डोणगाव, ता. केज) यांनी भोसरी (पिंपरी-चिंचवड, पुणे) मधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 20 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार 420, 406, 34 व महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम1999 चे कलम 3, 43 नुसार आरोपी कंपनीचे सिएमडी दिनेश कुरकुटे, दीपिका कुरकुटे, व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, सीईओ अमितकुमार पोंदे, कॅशीअर नितीन कुरकुटे, लीडर विनायक शिरोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे आहेत आरोपी
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. के. पुजारी यांनी तपासाची चक्रे फिरून दोन दिवसात व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, सीईओ अमितकुमार पोंदे, कॅशीअर नितीन कुरकुटे, लीडर विनायक शिरोळे या चौघांना 22 एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयाने चौघांनाही 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी दिनेश कुरकुटे व दीपिका कुरकुटे हे दांपत्य अद्याप फरार आहे.
'ते' ब्रँड अंबेसिडर कुठे आहेत?
याप्रकरणी अटकेत असलेले विनायक शिरोळे यांच्या प्रमाणेच कंपनीचे फाउंडर आणखी 12 ब्रँड अंबेसिडर देखील तेव्हढेच जबाबदार आहेत. यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी त्याची मोठी मदत होईल.आरोपी वाढणार, कोणाचीही गय नाही
याप्रकरणाचा प्रभाव राज्यभर असून हजारो गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे याची व्याप्ती मोठी आहे. तसेच आणखी आरोपी वाढणार आहेत. फरार दिनेश कुरकुटे व दीपिका कुरकुटे यांनाही लवकरच ताब्यात घेऊ. आरोपी कोणीही असो त्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'MBP LIVE 24' शी बोलताना दिली.शंभर कोटींचा घोटाळा?
राज्यातील शेतकरी, कामगार यांना 2 लाख 2 हजार 500 रुपये भरून 24 महिने 19500 रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम मध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच इतरांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. या बरोबरच राज्यातील सुमारे 3 हजार लोकांकडून प्रत्येकी 2 लाख 2 हजार पाचशे रुपये तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून घेतले. तसेच 7 हजार 500 रुपयांचा एक आयडी, 3 आयडी, 5 आयडी, 7 आयडी, 9 आयडी असे हजारो लोकांनी गुंतवणूक केली आहे. प्रत्यक्षात मात्र पैसे परत दिले नाहीत. अचानक कंपनी बंद करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. सुमारे 100 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.
जमिनीचे भिजत घोंगडे
दिलेली आश्वासने आश्वासन कंपनीने पूर्ण न केल्याने गुतवणूकदारांनी कंपनीकडे चौकशी केली असता कंपनी परतावा देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुतवणूकदारांच्या लक्षात आले. आता कंपनी परताव्याच्या पैशांच्या बदल्यात कंपनीने कोकणात रायगड जिल्ह्यातील मोशी येथे खरेदी केलेल्या ड्रीम कोकण सिटी प्रोजेक्ट मधील जमीन बळजबरीने गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्यात येत आहे. त्याचेही दोन वर्षांपासुन भिजत घोंगडे पडून आहे.पुण्यातील प्रकरण कंपनीने दाबले
ड्रीमव्हिजन कडून फसवणूक झालेल्या पुण्यातील काही गुंतवणूकदारांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात कंपनी विरोधात तक्रार अर्ज दिला असल्याचे समजते. मात्र येथे पोलिसांना हाताशी धरून कंपनीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही गुंतवणूकदार यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.नागपूर पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान, ड्रीमव्हिजन कंपनीच्या फसवणुकी विरोधात नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातही तेथील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांशी साटेलोटे करून प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न कंपनीकडून सुरू असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात आला आहे.
नेटवर्क मार्केटिंग फसवणुकीचे
पिंपरी-चिंचवड मुख्य केंद्र
कृष्ण प्रकाश साहेब न्याय द्या'
पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. ते आपल्याला निश्चित न्याय देतील असा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या राज्यातील शेतकरी, कामगार, बेरोजगार यांना विश्वास आहे.कायदा झुगारून करतायेत लूट
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातुन अनेक फसव्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या आपला धंदा चालवत आहेत. या कंपन्या केंद्र आणि राज्याने परिपत्रक काढून मांडलेल्या गाईडलाईनला फाट्यावर मारून मनमानी कारभार करत आहेत. कायद्याला न जुमानता बिनधास्त सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांना नेमके कुणाचे अभय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.काय आहे प्रकरण...संचालक कुरकुटे दाम्पत्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रा.लि. या नेटवर्क मार्केटिंग कंपनीची स्थापना केली. कुठल्याही प्रकारे कायदेशिर नसलेला 2 लाख भरा आणि तिपटीने परतावा मिळवा असा फसवा मनिसर्क्युलेशन प्लॅन काढून या जोडीने महाराष्ट्रासह जवळच्या गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांमधील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. तसेच राज्यातील पुणे, मुबई, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अकोला, सोलापूर आदी जिल्ह्यातील हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.