तीन वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील नक्षल प्रभावित ( सद्य चकमकीपासून जवळच) सावरगाव येथून स्नेही पी.एस.आय. भुमकर सरांचा फोन आला. सरिता माडवी नामक आदिवासी तरुणीच्या शिक्षणासाठी त्यांनी फोन केला.
कठीण परिस्थितीत १२ वी पूर्ण करूनही पुढील शिक्षणाच्या संधी तेथे उपलब्ध नव्हत्या. नागपूरच्या एका शैक्षणिक संस्थेने स्थानिक गरज ओळखून त्या भागात महाविद्यालय सुरु केले खरे पण तो प्रयोग अल्प काळच टिकला.
महाविद्यालय बंद करून सदर शैक्षणिक संस्थेने सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे चक्क नागपूरला नेली. तिला नगरला आणून आपल्याला तिचे पुढील उच्च शिक्षण पूर्ण करता येईल का ? याबाबत पी.एस.आय. भूमकर सरांनी विचारणा केली.
मी तिच्या प्रवेशाची चाचपणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागवली. सरिताने नागपूर, धानोरा तहसील कचेरी या ठिकाणी अनेक फेऱ्या मारून प्रवेशासाठी कागदपत्रे जमवली. स्थानिक नर्सिंग महाविद्यालयात तिला G.N.M या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळेल का, याबद्दल मी चौकशी केली.
इतक्या लांबून आणि तेही आदिवासी समाजातील एखादी मुलगी येथे येऊन सलग ३ वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करेल का.? याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य साशंक होते.
तिने कोर्स अपूर्ण ठेवल्यास.. सुट्टीला गेली आणि परत आलीच नाही तर … एक जागा वाया जाईल, अशा एक ना एक शंका त्यांनी उपस्थित केल्या. तुम्हीही कशाला जबाबदारी घेता, असा उलट सल्लाही त्यांनी मला न चुकता दिला. मी पालक म्हणून तिची पूर्ण हमी घेतली आणि तिला सहानुभूतीने प्रवेश देण्याबद्दल विनंती केली.
अथक प्रयत्नांती 'युवान आणि सादद्वारे' आम्ही G.N.M. या व्यावसायिक अभ्यासक्रमास तिचा प्रवेश निश्चित केला. मनात विश्वास वाटत होता पण तरीही नाही म्हणून सरिताला तुझी लेखी हमी घेतल्याची एकदा जाणीव करून दिली होती.
आज 'तो विश्वास' सरिताने सार्थ ठरविला. सलग ३ वर्ष अतिशय समर्पीतपणे तिने GNM हा पदवी कोर्स पूर्ण केला. इतर विद्यार्थी आसपास, फार तर फार शेजारील जिल्ह्यात राहायला असल्याने त्यांना सुट्टीला घरी जायची मुभा होती.
पण लॉकडाऊन काळात सरिताला गडचिरोलीला आणि तेथून पुढे जंगल परिसरातील दुर्गम सावरगावला बस, रेल्वेने जायची सुविधाच नव्हती. त्यामुळे कोरोना काळात सर्व घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेत असतांना तिने ऑफलाईनच शिक्षण पूर्ण केले.
वेळप्रसंगी महाविद्यालयाशी संलग्न कोविड वॉर्डला वैद्यकीय सेवाही सरिताने दिली. परवा सकाळी वर्तमानपत्रात गडचिरोलीच्या चकमकीची हेडलाईन वाचत होत, तोच सरिताचा अहमदनगर स्टेशनला पोहचल्याचा फोन आला.
मी विचारलं, हे 'ग्यारापत्ती' जंगल किती दूर आहे तुझ्या गावापासून ? तिने सांगितलं जवळचं.. १५ मिनिटांच्या अंतरावर.. बरं झालं, लवकर निघाली, मी म्हणालो.
सरिता तब्बल २ वर्षांच्या कालखंडानंतर गावाकडे गेली होती. गावावरून परतल्यावर आज सरिताच्या हाती पहिला पगार पडला. “पहिला पगार कुणी देवाला दान करतं, कुणी आई-वडिलांच्या हाती देतं..
पण मला ‘युवान'साठी माझा पहिला पगार द्यायचा आहे”, अशी इच्छा सरिताने पीएसआय भूमकर यांच्याकडे व्यक्त केली. भूमकर सरांनी लागलीच मला फोन केला.
मी म्हणालो, "अभिनंदन! आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात ही ‘कृतज्ञतेची’ भावना तयार होणं आणि कधी काळी ‘घेणारे’ हात ‘देणारे’ होणं, हेच आपल्या कामाचं खरं यश आहे."
- संदिप कुसळकर (युवान, अहमदनगर)
www.yuvaan.org