एकीकडे संपूर्ण राज्य भाऊबीजेचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असताना दुसरकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाला आग लागल्याची दु:खद ब्रेकिंग न्यूज समोर आली. या आगीत तब्बल ११ कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. तर ७ जण गंभीर असल्याने त्यांना इतरत्र हलवण्यात आले.
या घटनेने अवघा महाराष्ट्र हेलावलाय. पण, आपण मागील घटनांमधून धडा घेणार कधी ? हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आग लागण्याची जी प्रमुख कारणे असतात, त्यापैकीच एक कारण या घटनेतही आज ना उद्या समोर येईल. किंवा कदाचित ही घटनाही विस्मरणात गेली तर तेही येणार नाही.
रुग्णालयांत आग लागल्याने रुग्ण दगावल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी बंगळुरू, मुंबई, भंडारा जिल्हा आणि नाशिकमध्येही असे प्रकार घडलेले आहेत. सर्वच प्रकार दुर्दैवी होते. पण जितक्या वेगाने त्यावर पडसाद उमटतात तितक्याच वेगाने आजच्या नगरच्या दुर्दैवी घटनेनंतरही उमटण्यास सुरूवात झाली आहे.
संबंधित रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते का, हा सर्वात मुळ प्रश्न. त्यानंतर अशी परिस्थिती ओढवली तर काय खबरदारी घ्यायची, यासाठी तिथले व्यवस्थापन सक्षम आहे का हा दुसरा प्रश्न.. असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत, आणखीही केले जातील. या घटनेचे राजकारणही होईल.
मृतांची संख्या अधिक असल्यानेच अशा घटनांकडे लक्ष वेधले जाते. अन्यथा आपल्याला आजूबाजूला गल्लोगल्ली, शहरात अलीकडच्या काही काळात नव्याने उभी रहात असलेली अनेक रुग्णालये, पाहता या आस्थापना अशा घटनेची खबरदारी घेत असतील का, असा प्रश्नही मनात येत नाही, हेही एक दुर्दैवच.
स्थानिक नेते, पुढारी, संघटना अशा घटनांनंतर संबंधित आस्थापना आणि व्यवस्थापनावर टीका करायला लागतात. ते साहजिकही आहे. विरोधी पक्षही अशा दुर्घटनांकडे केवळ भांडवल म्हणून पाहतात, आणि सरकारी पक्ष, पदाधिकारी सारवासारसारव करण्याचा खटाटोप करतात, हे चित्रही नेहमीचेच आहे.
मोठे पदाधिकारी, नेते, मंत्री, त्यांचा लवाजमा, यांच्या भेटीगाठी सुरू होतात.. आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण पुढे काय होते, हे कोणीही पुन्हा वळून पहात नाही. जोवर अशी पुढची दुर्घटना होत नाही. तोवर. झालीच तरीही तीच पद्धत काही दिवस सुरू राहणार, हे जनतेनेही आता समजून घेतलेय.
मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिल्याने त्यांचे नुकसान भरून येणारे नसतेच. पण ती देण्याची तत्परता सरकारकडे असावी लागते. सुदैवाने तशी घोषणा करण्याची घाई प्रत्येक सरकार करते. पण, तितकीच घाई, तितकाच धाक, अशा रुग्णालयांच्या व्यवस्थापनांवर राहिला तर पुन्हा अशा दुर्घटना घडणार नाहीत.
जबाबदार प्रशासनच अवैध रुग्णालयांना पाठीशी घालून बेजबाबदारपणे वागत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? अहमदनगर जिल्ह्यातील किती रुग्णालयांचे फायर ऑडीटच झालेले नाही, याचा शोध घेण्याची गरज आहे.
तसेच फायर ऑडीट मध्ये अनेक रुग्णालये कायदेशीर निकष पूर्ण करत नाहीत, हे पाहणीत उघड होऊनही त्यांच्याकडे डोळेझाक केली जातेय.
अनेक गंभीर घटना घडूनही अशा अवैध रुग्णालयांवर कुठलीही कारवाई न होता ती बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अशा अवैध रुग्णालयांना चिरीमिरीसाठी पाठीशी घालणारे झारीतले हे शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
अन्यथा जिल्ह्यात आणखी एखाद्या रुग्णालयास आग लागून पुन्हा निष्पाप रुग्ण होरपळून निघतील आणि हळहळ करण्याखेरीज आपल्या हाती काहीच उरणार नाही.
- Adv. उमेश अनपट (मुख्य संपादक) MBP Live24