'जय भीम' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

'दैनिक दिव्य मराठी'चे स्टेट एडिटर संजय आवटे यांच्या 'फेसबुक वॉल'वरून साभार..

'जय भीम'चा सतत उल्लेख ऐकून ड्रायव्हरनं मागं वळून पाहिलं. नेहमीचा ड्रायव्हर नव्हता. बदली ड्रायव्हरनं शेवटी न राहावून विचारलंच- "सर, तुम्ही 'जय भीम'पैकी का?  मित्राचा आज सकाळी फोन आला. तुम्हा लोकांना त्या सिनेमाचं फार पडलेलं असतं. पण, अख्ख्या सिनेमात एकदा तरी 'जय भीम' घोषणा आहे का? मग तो सिनेमा 'आपला' कसा मानायचा?  

माध्यमं एवढी प्रगत झाली आहेत आणि प्रत्येकाच्या हातात मीडिया आहे, त्यामुळं खरं म्हणजे सूक्ष्म नि तरल प्रसंगसुद्धा प्रभावीपणे भिडायला हवेत. होतं उलटंच. एवढे बटबटीत कसे होत चाललो आहोत आपण? दोन डोळ्यांतली वेदना आणि दोन ओळींमधली जागा वाचता येऊ नये, एवढे निरक्षर कसे झालो आहोत आपण? 

'जय भीम' काय आहे? 

परिघावरच्या माणसाचा पृष्ठभागावर उमटणारा आवाज म्हणजे 'जय भीम' आहे. बेमुर्वतखोर आणि मुर्दाड व्यवस्थेला विचारलेला सवाल म्हणजे 'जय भीम' आहे. ज्यांना आजवर नाकारलं गेलं, त्यांच्यासाठी खुलं झालेलं संधींचं आकाश म्हणजे 'जय भीम' आहे. 

प्रसंगी प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर बसून आपले माणूसपणाचे हक्क मिळवणं म्हणजे 'जय भीम' आहे. कोण्या येरूला आदिवासी जमातीतल्या राजाकन्नूसाठी ॲडव्होकेट चंद्रूच्या डोळ्यांत दिसणारी करूणा म्हणजे 'जय भीम' आहे. सगळे जग विरोधात गेलेले असतानाही या आदिवासींना न्याय देणारं संविधान म्हणजे 'जय भीम' आहे. 

भीम पुतळ्यात नाही. भीम घोषणेत नाही. 'जय भीम' ही घोषणा नाही केवळ, तो 'सक्सेस पासवर्ड' आहे. एका क्लिकसरशी, चिरेबंदी वाड्यांचे बंद दरवाजे उघडणारा. माणसांच्या गावात घेऊन जाणारा. भिंती पाडणारा. सेतू उभारणारा पासवर्ड. 

शिवाजी महाराज पुतळ्यात नसतात. कोण्या शिवाजीनगरात नसतात. गुलामगिरीतल्या माणसाच्या डोळ्यांत स्वातंत्र्याची आकांक्षा पेरणारी प्रेरणा असते शिवाजी महाराज. रयतेसाठी स्वतःला संकटात घालणारी घोडदौड असते शिवाजी महाराज. 

या सगळ्या प्रेरणाच आपण जाती-धर्मांमध्ये बंदिस्त करून टाकल्या. त्याचे पुतळे केले. देव केले. मंदिरे उभी केली. त्या भरवश्यावर अनेकांनी आपले मॉल उभे केले. त्याला लागून काहींच्या छोट्या टप-या उभ्या राहिल्या. राजाकन्नू मात्र टाचा घासत मरतच राहिला. ज्यासाठी हा संघर्ष उभा करायचा, ती मूळ प्रेरणा म्हणजे 'जय भीम'.

हे लिहीत असतानाच निकिताचा फोन आला. तीच ती निकिता, चिखलद-याजवळच्या आमझरी आदिवासी गावातली. दहावीत शिकणारी. "सर, मी शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत भाषण करणारेय. महात्मा गांधींवर बोलणार आहे." 

वक्तृत्व या शब्दाचा तिनं केलेल्या उच्चारामुळं याला हसू आलं. आणि, भारी वाटलं की, ही पोरगी आता भाषण करणार आहे. तेही गांधींवर. तोच तो वेडा म्हातारा, ज्याच्यावर गोळ्या घातल्या नराधमांनी. पण, मेला तरी हा म्हातारा काही यांना सोडत नाही. त्याच्यावर पुन्हा पुन्हा गोळ्या घालाव्या लागतात. पण, तो काही मरत नाही. 

आमच्या अडाणी कोरकू आदिवासी चंपूची नात आज महात्मा गांधींवर भाषण करणार आहे. हे असते 'जय भीम'. 'जय भीम' हा 'सक्सेस पासवर्ड' आहे. आणि, आपल्याला जिंकायचं आहे..!

- संजय आवटे (लेखक दैनिक भास्कर वृत्तपत्रसमुहाच्या 'दैनिक दिव्य मराठी'चे राज्य संपादक आहेत.)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !