बालपण म्हणजे तरी काय हो नक्की?
कुठं असतं हे बालपण नि कसं असतं?
मोठी लोकं म्हणून गेलीत की एकदा बालपण गेलं की ते पुन्हा कधीच परत येत नसतं..
पण मला तरी वाटतं की आपण कधीही आणि केव्हाही, किंबहुना रोजच बालपण अनुभवू शकतो.. गरज आहे फक्त दृष्टीची.. दृष्टीकोनाची..
धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि पैशांच्या युगात जर तुम्हाला मनासारखा चहा मिळाला म्हणून दिवस छान जात असेल, किंवा डब्यात एखादी आवडीची भाजी मिळालीय म्हणून तुम्ही लंच ब्रेकची वाट बघत असाल..
आज घराबाहेर पडल्यावर ट्रॅफिक आणि गर्दी- वर्दळीचा विचार डोक्यात येण्यापेक्षा बाहेर पडायला मिळणार, रस्त्यांवर गाडी पळवायला मिळणार, झाडी आणि नवीन चेहऱ्याची माणसं बघायला मिळणार म्हणून जर खुश होत असाल तर तुमचा 'दिल तो बच्चा हैं जी..!'
ऑफिस सुटल्यावर घरच्या कटकटी ऐकवण्यापेक्षा तुम्ही मित्रांसोबत टाळ्या मारून चहाचे फुरके घेत असाल तर अहाहा..! घरात असताना विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा आवाज आल्यावर पटकन डोकावून बघत असाल..
रंगीबेरंगी फुलं बघितली की दिल डोळ्यांमध्ये येत असेल, चॉकलेट किंवा ब्राऊनी खाताना मस्त चाटून पुसून खात असाल, चवीने मोमोज आणि नूडल्स खाताना आपण कसे दिसतोय याचा विचार करत नसाल..
दिवाळीच्या फराळात आधी चिवडा चकलीवर ताव मारत असाल, त्यातले काजू, शेंगदाणे, डाळ आणि खोबरं निवडून संपवत असाल तर 'बच्चे ही तो हो तुम..!'
रोजच्या जगण्यात मरमर तर आहेच.. आणि अडचणी कुणाला नाहीत? पण म्हणून हिरमुसले चेहरे घेऊन जगण्यात मजा नाय.. छोटी मुलं जसं नावडत्या व्यक्तीकडे जात नाहीत तसं आपणही आपल्याला त्रास होणाऱ्या व्यक्ती नि वस्तूंपासून दूर राहायला काय हरकतेय?
छोटी मुलं जसा रडून नकार देतात तसा आपण स्पष्ट नकार द्यायला का घाबरतो? बच्चू लोक जसं बिनधास्त कुठलीही गोष्ट करतात तसा धाडसीपणा आपण का नाय करू शकत?
कारण आपण आपल्याभोवती आवरणं घालून घेतलीयेत शहाणपणाची, समजदरपणाची नि आपण मोठे झालो असल्याची.. उगाच स्वतःला हुशार नि so called समाजाच्या चौकटीत बसवून घेण्यासाठी धडपडतो आपण..
ही धडपड थांबली तर आपणही (म्हणजे तुम्ही) रोज बालदिन मनवू शकू.. खरं तर माझा तर रोजचा दिन बालदिन असतो.!!
म्हणून तर मी म्हणते, 'अपना हर दिन ऐसें जियो, जैसें के आखरी हो.!!'
तर तुम्हा सर्वांना बालदिनाच्या चॉकलेटचा डब्बा भरून शुभेच्छा.!!
तीच बालीश,
प्राची सोनवणे-धावडे