अहमदनगर - जालना, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात इलेक्ट्रिकल साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने चोऱ्या करण्यात तो आणि त्याचे साथीदार सराईत झाले. या टोळीने चारही जिल्ह्यांच्या पोलिसांना जेरीस आणले. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांचीही या टोळीने झोप उडवली होती.
त्यामुळे पोलिस उपमहानिरीक्षक शेखर यांनी त्याची व त्याच्या टोळीची संपूर्ण माहिती काढली. तो अहमदनगर जिल्ह्यात असल्याची पक्की माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना विशेष पथक नेमून त्याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. अन् तो पोलिसांना सापडला.
या कुख्यात आरोपीच्या ताब्यातून तब्बल सुमारे साडेचौदा लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर) असे या दरोडेखोराचे नाव आहे. एखाद्या सिनेमात शोभेल असा त्याचा गुन्हेगारीर कारकिर्दीचा प्रवास आहे. त्यामुळे चार जिल्ह्यांचे पोलिस त्याच्या मागावर होते.
नगर क्राईम ब्रँचच्या एका पथकाने त्याला पकडले. इतकेच नाही, तर त्याच्याकडून तब्बल १४ लाख ६० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. सध्या त्याला श्रीरामपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखाी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
त्याने नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, सोनई, शेवगांव, तसेच जालना, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून चारचाकी व दुचाकी वाहने चोरली. तसेच नाशिक, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून डीव्हीआर, मोबाईल, कॉम्प्युटरदेखील चोरले होते. त्याच्याविरुद्ध २५ गुन्ह्यांची नोंद आहे.