मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कामाच्या ताणामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मानेचा त्रास व्हायला लागला होता. त्यामुळेे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले होते.
नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील 'सर्व्हायकल स्पाईन' संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, अशी माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
या शस्त्रक्रियेच्या वेळी मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ. अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ आहेत, तर डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.