बायोडिझेल तस्करी रॅकेटमध्ये शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुतेंचा नेमका 'रोल' काय ?

अहमदनगर - जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिस दलाने कारवाई करत जप्त केलेल्या अवैध बायोडिझेल तस्करी प्रकरणाचे धागेदोरे शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याच्यापर्यंत गेले आहेत. या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

त्यामुळे एक पोलिस पथक त्याच्या अटकेसाठी रवाना झाले. मात्र याची कुणकुण लागल्याने सातपुते पसार झाला. शहरप्रमुख सातपुते याचे नाव या गुन्ह्यात जवळपास एक महिन्यानंतर समोर आले आहे. त्यामुळे या निष्कर्षाप्रत पोचण्यात पोलिसांना उशीर झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दि. २२ ऑक्टोबर रोजी पहाटे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्यासह महसूल पथक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर सोलापूर रोडवर छापा टाकला. त्यावेळी बायोडिझेल तस्करीचे मोठे रॅकेट उजेडात आले. पोलिसांनी या गुन्ह्यात १० आरोपींना अटक केली आहे. 

दरम्यान, पोलिसांच्या रेकॉर्डवर दिलीप सातपुते याचे नाव आले, हे खरे असले तरी त्याचा नेमका सहभाग काय, या गुन्ह्यात त्याची नेमकी भूमिका काय, हे अद्याप समोर आलेले नाही. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सातपुते याचे नाव गुन्ह्यात आले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या रॅकेतसंदर्भात काही महत्वाची कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. त्यामुळे दिलीप सातपुते यांच्यासह आणखी कोण कोण या रॅकेटमध्ये सहभागी आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी सातपुते याला अद्याप या गुन्ह्याचा मास्टरमाइंड म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !