मुंबई - 'प्रतीक काळे' या युवकाच्या आत्महत्येमुळे राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे गडाख यांनी याबाबत प्रथमच आपली बाजू मांडली आहे. प्रतीकने एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या पोस्टमध्ये गडाख यांचा उल्लेख असल्याने त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
(हा व्हिडिओ पहा..)
या घटनेनंतर प्रतिकच्या बहिणीने अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यात ७ जणांची नावे घेतली असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच या गुन्ह्यात आतापर्यंत ४ जणांना अटक झालेली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रतीक काळे हा शंकरराव गडाख यांचे लहान बंधू प्रशांत गडाख यांचा खासगी स्वीय सहायक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची बदली झाली. त्यांनतर तो नैराश्यात होता. काही दिवसांपूर्वी त्याने काही व्यक्तींच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करत गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.
तथापि, भारतीय जनता पक्षाचे नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे पोलिस अधीक्षक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची या प्रकरणात सखोल चौकशी करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
बुधवारी दुपारी मुंबई येथे भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांची या प्रकरणात चौकशी करण्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत मात्र शंकरराव गडाख अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही.
मयत प्रतीक याच्या बहिणीने ज्या व्यक्तींची नावे फिर्यादीत 'आरोपी' म्हणून घेतलेली आहेत, त्यांना प्रतीक काळे हा त्याच्या चांगल्या कामामुळे गडाख कुटुंबीयांच्या जवळ जात होता, हे सहन झाले नाही म्हणून त्यांनी त्याला मानसिक त्रास दिला, असे नमूद केलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी यादृष्टीने तपास सुरू केला आहे.